
शासन आपल्या दारी शिबिराचा लाभ १ लाखाहून अधिक नागरीकांनी घेतला फायदा
‘शासन आपल्या दारी‘चे
दुप्पट उद्दीष्ट साध्य
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३० : जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एकावेळी ''शासन आपल्या दारी'' अभियानांतर्गत करण्यात आलेल्या शिबिरात १ लाख ८१ हजार ३७६ नागरिकांना शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ देण्यात आला. जिल्ह्याला दिलेल्या उद्दीष्टापेक्षा दुप्पट नागरिकांना लाभ देण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
या अभियानांतर्गत मंगळवारी एकाच दिवशी संपूर्ण जिल्हयात शिबिरांचे आयोजन करण्यात आले.७५ हजार नागरिकांना लाभ देण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात एक लाख ८१ हजार ३७६ हजार नागरीकांना लाभ देण्यात आला, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
सकाळी ११ वाजता शिबिरांना लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरवात करण्यात आली. काही ठिकाणी सभागृहांत, तर काही ठिकाणी मंडप उभारून विविध यंत्रणांचा कक्ष स्थापन करण्यात आले. पुणे शहरात १० हजार ९२९, हवेली (२७,४१९), मुळशी (३,९५०), भोर (२८,४४२), मावळ (३०६८), वेल्हे (८,३९०), जुन्नर (३,५२३), खेड (१०,८३७), आंबेगाव (२४,२०३), शिरूर (३३,२२३), बारामती (२१,४३१), पुरंदर (५,५१७) आणि अपर तहसील कार्यालय पिंपरी चिंचवड (४४२) लाभार्थ्यांना लाभ झाला.
शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य, जलसंपदा, पशुसंवर्धन, पोस्ट, पंचायत समिती, निवडणूक शाखा, भूमी अभिलेख, सामाजिक वनीकरण, वन विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, एकात्मिक बालविकास विभाग, दुय्यम निबंधक सहकारी संस्था कार्यालय आदी विविध विभागांनी सहभाग घेतला. नागरिकांना शिधापत्रिका, दिव्यांग प्रमाणपत्र, विविध दाखले, मतदार नोंदणी, नवीन वीज जोडणी, आधार कार्ड अद्ययावत करणे या सेवांसह संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री सन्मान निधी योजना, मनरेगा, दिव्यांगांना आधार कार्ड, निर्वाह भत्ता, आदी शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. यावेळी नागरिकांना शासकीय योजनांची माहितीदेखील देण्यात आली.
------------