
‘एमआयएमचा समावेश महाविकास आघाडीत करावा’
पुणे, ता. ३१ ः भारतीय जनता पक्षविरोधी राजकीय पक्षांची आघाडी मजबूत व्हावी, यासाठी ‘एमआयएम’चा समावेश महाविकास आघाडीत करावा, अशी मागणी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष मुख्तार शेख यांनी एका निवेदनाद्वारे तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडे बुधवारी केली.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांना पाठविलेल्या निवेदनात शेख यांनी म्हटले आहे की, ‘भाजपला रोखण्याची ताकद महाविकास आघाडीतच आहे. त्यासाठी भाजपविरोधी अन्य राजकीय पक्षांनाही आघाडीत सामावून घ्यायला हवे. राज्यातच नव्हे तर, देशातही अनेक भागांत ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. भाजपविरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी ‘एमआयएम’ला महाविकास आघाडीत घ्यायला हवे. एमआयएमचे अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसी, महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनीही महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबत सूतोवाच केले आहे. त्याची दखल घेऊन ‘एमआयएम’ला महाविकास आघाडीत सहभागी करून घ्यावे आणि येणाऱ्या महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लढवाव्यात.’ या निवेदनाची प्रत शेख यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही पाठविली आहे.