शाळा, अंगणवाड्यांची कामे तातडीने पूर्ण करा

शाळा, अंगणवाड्यांची कामे तातडीने पूर्ण करा

पुणे, ता. ३१ : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर केलेली शाळा आणि अंगणवाड्यांची कामे त्वरित पूर्ण करावी, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. तसेच शाळा वर्गखोली, स्वच्छतागृह बांधकाम, पिण्याचे पाणी, वाचनालय आदी सुविधांच्या प्रस्तावित ४०० कामांची तपासणी त्रयस्थ संस्थेकडून करण्यात यावी, अशा सूचनाही पाटील यांनी दिल्या आहेत.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, अतुल बेनके, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘‘बांधकामासाठी जागा उपलब्ध असलेल्या अंगणवाडी कामाबाबत गावनिहाय माहिती सादर करावी व अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी अपेक्षित खर्च सादर करण्यात यावा. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी देण्यात येईल. जुलैच्या प्रारंभी शाळा व अंगणवाडी कामांचा आढावा घेण्यात येईल. १५ जूनपर्यंत कामांना सुरुवात करण्यात यावी. मनरेगा, स्वच्छ भारत अंतर्गत काम करणाऱ्या यंत्रणांची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल.’’ या वेळी वाघमारे यांनी गतवर्षी झालेल्या शाळा, अंगणवाडी बांधकाम तसेच रस्त्यांच्या कामांच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली.

औषधांचा पुरेसा साठा ठेवा
पावसाळ्यात साथजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आवश्‍यक खबरदारी घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा पुरेसा साठा ठेवावा. वैद्यकीय अधिकाऱ्यांना पावसाळ्याच्या कालावधीत रजेवर जाऊ नये याबाबत सूचना द्याव्यात, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com