
‘खडकी कॅन्टोन्मेंटमधील सलग क्षेत्राची माहिती द्या’
पुणे, ता. ३१ ः पुणे कॅन्टोन्मेंट व खडकी कॅन्टोमेंटचा भाग पुणे महापालिकेत समाविष्ट केले जाणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर खडकी कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत खडकीतील सलग किती जमीन महापालिकेत येऊ शकते, त्यावर कोणाची मालकी आहे, याची माहिती सादर करावी, अशी मागणी केली आहे. त्यावर अभ्यास करून सात दिवसांत ही माहिती दिली जाईल, असे खडकी कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार आणि खडकी कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबिन बालेजा यांच्यामध्ये बैठक झाली. तर पुणे कॅन्टोन्मेंटची बैठक पुढील काही दिवसांमध्ये होणार आहे. या बैठकीमधील पुणे महापालिका व खडकी कॅन्टोन्मेंटमधील सद्यःस्थितीवर चर्चा झाली. खडकी कॅन्टोन्मेंटचे एकूण क्षेत्रफळ तीन हजार २०० एकरचे आहे. त्यातील किती जमीन कॅन्टोन्मेंटमध्ये राहणार यासह सलग जमीन महापालिकेत कोणती येणार, तेथे मालकी कोणाकडे आहे, ही माहिती सादर करू, असे कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी बालेजा यांनी आयुक्तांना सांगितले.
‘‘खडकी कॅन्टोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बुधवारी चर्चा झाली. त्यामध्ये त्यांनी खडकीतील किती सलग जमीन महापालिकेत येऊ शकते व त्याची मालकी कोणाकडे आहे. याचे मॅपिंग करून हा अहवाल सात दिवसांत दिला जाईल. पुणे कॅन्टोन्मेंटसोबत बुधवारी बैठक झाली नाही, ती पुढील काही दिवसांत होईल.’’
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका