Cloud Kitchen : पुण्यात क्लाऊड किचनची चलती! कसे चालते ‘क्लाऊड किचन’ वाचाच pune cloud kitchen startup Good response trend | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cloud Kitchen
पुण्यात क्लाऊड किचनची चलती!

Cloud Kitchen : पुण्यात क्लाऊड किचनची चलती! कसे चालते ‘क्लाऊड किचन’ वाचाच

पुणे - हॉटेल सुरू करायच असेल तर चांगली जागा शोधा, स्वयंपाकी बघा, कर्मचारी ठेवा, देखभाल दुरुस्ती करा आणि एवढे सर्व करूनही चांगला प्रतिसाद मिळेल की नाही याची खात्री नसते. त्यामुळे कमी रिस्क घेत क्लाऊड किचन सुरू करण्याचा ट्रेंड पुण्यात जोर धरू लागला आहे. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.

हॉटेल व्यवसायाला कोरोना काळात मोठा झटका सहन करावा लागला. त्याकाळात बंद झालेली अनेक हॉटेल पुन्हा सुरूच झाली नाहीत. मात्र आता काहीतरी भन्नाट थीम घेऊन हॉटेल सुरू करण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. अगदी छोट्या जागेत देखील हॉटेल सुरू करून चांगला व्यवसाय करण्याची किमया अनेकांनी साध्य केली आहे. याच व्यवसायाचा एक भाग म्हणून क्लाऊड किचनचे स्टार्टअप सुरू करण्यास देखील अनेकांची पसंती मिळत आहे.

कमी गुंतवणूक व रिस्क

कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल महत्त्वाचे ठरते. तसेच गुंतवणुक केल्यानंतर त्यातून मिळणारे उत्पन्न पुरेसे असेल की नाही ही रिस्क देखील असते. मात्र हॉटेल सुरू करण्याच्या तुलनेने क्लाऊड किचनमध्ये तोटा होण्याचा धोका कमी असतो. तसेच यासाठी घेतलेले साहित्य इतर ठिकाणी देखील वापरता येते. त्यामुळेच अनेकांनी थेट हॉटेल सुरू करण्यापेक्षा क्लाऊड किचनला पसंती दिल्याचे दिसते.

‘क्लाऊड किचन’ म्हणजे नक्की काय?

क्लाऊड किचन म्हणजे एक प्रकारचे हॉटेलच असते. पण या किचनमध्ये आपल्याला हॉटेलमध्ये बसून ऑर्डर देतो, तशी ऑर्डर देता येत नाही. तसेच तेथे जाऊन ऑर्डर देवू शकत नाही. क्लाऊड किचनचे कामकाज पूर्णतः ऑनलाइन चालते. आपण फोन करून, फूड डिलिव्हरी अ‍ॅपद्वारे किंवा वेबसाइट वरून खाद्यपदार्थांची ऑर्डर करू शकतो. त्याच बरोबर एकाच किचनमधून वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सचे खाद्यपदार्थ पुरविले जातात.

वाढण्याची कारणे

- हॉटेलच्या तुलनेत कमी भांडवल लागते

- व्यवस्थापनासाठी करावी लागणारी कसरत कमी आहे

- देखभालीचा खर्च हॉटेलच्या तुलनेत कमी

- मोठ्या जागेची गरज भासत नाही

- खाद्यपदार्थांची चव आणि तंत्रज्ञानावर अवलंबून असलेला व्यवसाय

- थेट ग्राहकांशी संबंध येत नसल्याने सेवा देण्याची भाग कमी होतो

का मिळत आहे या स्टार्टअप्सला पसंती?

- खाद्यपदार्थांच्या चवीत असलेली भिन्नता

- घरून ऑर्डर करण्याची वाढलेली सवय

- ऑर्डरवर दिल्या जाणाऱ्या ऑफर

- कमी वेळेत मिळणारी डिलिव्हरी

क्लाऊड किचन सुरू करण्याची कल्पना आम्हाला लॉकडाउनमध्ये सुचली. आत्तापर्यंत आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आम्ही दोन प्रकारचे गोवन पदार्थ पुरवतो. या स्टार्टअपला मिळालेल्या प्रतिसादानंतर आम्ही ‘तुलसी’ नावाने आणखी एक क्लाऊड किचन सुरू केले आहे. ज्याद्वारे मुलांना लंच बॉक्स पुरवले जाते.

- श्रद्धा सांवत, संस्थापक, गोएंचे

टॅग्स :Startuppunekitchen