
गुन्हे वृत्त
मद्यासाठी ऑनलाइन पैसे
देऊनही ग्राहकाला मारहाण
पुणे, ता. १ : ऑनलाइन पेमेंट करूनही मद्य देण्यास नकार दिल्यामुळे पैसे परत मागणाऱ्या ग्राहकाला वाइन शॉपच्या व्यवस्थापक आणि कामगाराने मारहाण केली. ही घटना सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द येथील जेम्स वाइन शॉपमध्ये घडली.
या प्रकरणी संतोष भीमराज दहिवळ (वय ४७, रा. हिंगणे खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून व्यवस्थापक चंदन म्हात्रे, कामगार पप्पू खुणे याच्याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी मद्य घेण्यासाठी २८० रुपये ऑनलाइन पेमेंट केले, परंतु वाइन चालकाने फिर्यादीला मद्य देण्यास नकार दिला. त्यावर फिर्यादीने पैसे परत मागितले. त्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी आणि लाकडी बांबूने मारहाण करून जखमी केले.
पोटात लाथ मारल्यामुळे विवाहितेचा गर्भपात
पुणे, ता. १ : विवाहितेच्या पोटात लाथ मारल्यामुळे तिचा गर्भपात झाल्याची धक्कादायक घटना वाघोली परिसरात घडली. या प्रकरणी एका २२ वर्षीय विवाहितेने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी राहुल मुकेश पवार (वय २१) आणि करण मुकेश पवार (वय २५, दोघे रा. विटकर चाळ, वाघोली) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे वाघोली परिसरात राहतात. फिर्यादी त्यांच्या आईसोबत २६ मे रोजी रात्री घरी जात होत्या. त्यावेळी राहुल पवार याने फिर्यादीच्या आईला शिवीगाळ करून विवाहितेच्या पोटात लाथ मारली. तसेच, दोघा आरोपींनी फिर्यादी महिलेला दगड फेकून मारले. त्यावेळी पोटात दगड लागून रक्तस्राव झाल्यामुळे या महिलेला ससून रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान या महिलेचा गर्भपात झाला.