काँग्रेस भवनच्या मुद्यावरून ट्विटर वॉर

काँग्रेस भवनच्या मुद्यावरून ट्विटर वॉर

पुणे, ता. १ : शहरातील काँग्रेस भवनच्या मुद्यावरून काँग्रेस आणि भाजपमधील ‘ट्विटर वॉर’ गुरुवारी दुपारी थेट रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस भवनच्या इतिहासाची माहिती देण्यासाठी भाजप शहर कार्यालयाकडे जाणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी महापालिकेजवळ रस्त्यावर रोखले.

शहर भाजपने ट्विटरवर ‘स्वत:च्या पक्षाची राजवाडावजा इमारत बांधण्यापलीकडे काँग्रेसने पुण्यात काय केले? भाजपने पुण्यात शाश्वत विकासाला प्राधान्य देत कायापालट केला’ अशा आशयाचे ट्विट केले. त्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून ‘जेधे-मोरे-गाडगीळ या स्वातंत्र्यसैनिकांनी लोकवर्गणीतून काँग्रेस भवन बांधले. स्वातंत्र्यसैनिक नरहर विष्णू ऊर्फ काकासाहेब गाडगीळ यांनी पत्नीचे दागिने गहाण ठेवून ही ऐतिहासिक वास्तू उभारली..’ असे ट्विट करून ट्विटला प्रतिउत्तर दिली.

या ट्विटर वॉरनंतर गुरुवारी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते हे काँग्रेस भवनच्या इतिहासाची माहिती देण्यासाठी भाजप शहर कार्यालयाकडे निघाले. त्यावेळी पोलिसांनी काँग्रेस भवनाचे प्रवेशद्वार लावून कार्यकर्त्यांना थांबवले, परंतु कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरून उड्या मारून आपला मोर्चा भाजप कार्यालयाकडे वळवला. त्यावेळी पोलिसांनी ‘आम्ही तुमची नंतर भेट घालून देतो’, असे सांगत कार्यकर्त्यांची समजूत काढली.

स्वातंत्र्यसेनानींचा अपमान
युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अक्षय जैन म्हणाले, ‘‘आम्ही कसलेही आंदोलन करणार नव्हतो. तर, फक्त भाजपच्या शहराध्यक्षांना काँग्रेस भवनाची माहिती देणारी एक पुस्तिका देणार होतो. जेणेकरून त्यांना इतिहासाची खरी माहिती मिळेल. स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात असलेल्या काँग्रेस भवनच्या इमारतीला वेगळे महत्त्व आहे, ही बाब आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून देणार होतो. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करून आम्हाला तेथे जाण्यापासून थांबविले. युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल शिरसाट म्हणाले, या वास्तूबाबत बोलणे म्हणजे स्वातंत्र्यसेनानींचा अपमान आहे. प्रथमेश आबनावे, हनुमंत पवार, संतोष पाटोळे, स्वप्नील नाईक, वाहिद नीलगर, परवेझ तांबोळी, केतन जाधव आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com