संतांच्या साक्षीने पर्यावरणाचा जागर!

संतांच्या साक्षीने पर्यावरणाचा जागर!

पुणे, ता. १४ ः ‘नगरे रचावीं। जळाशये निर्मावीं।। महावनें लावावीं। नानाविधें।।’ असा संदेश देणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि ‘वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं वनचरें। पक्षी ही सुस्वरें आळविती।।’, असे सांगणारे जगद्‍गुरु तुकाराम महाराज! सर्वच संतांनी आपल्या अभंगांतून वेळोवेळी निसर्गारक्षणाचे आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. संतांच्या याच शिकवणीचे स्मरण करत ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘साथ चल’ उपक्रमात पर्यावरणाचा जागर करण्यात आला. पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या संतांच्या पालख्यांच्या साक्षीने आणि वैष्णवांच्या साथीने पुणेकरांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली. या उपक्रमात सर्व धर्म, जाती, पंथाचे प्रतिनिधी उत्साहाने सहभागी झाल्याचे चित्र बुधवारी सकाळी महात्मा गांधी बस स्थानक (पुलगेट) येथे दिसले. समाजातील विविध घटकांची नाळ जोडणाऱ्या या उपक्रमाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आषाढी वारीनिमित्त पुण्यातून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दिंड्यांसह पंढरपूरच्या दिशेने बुधवारी (ता. १४) सकाळी मार्गस्थ झाला. त्यावेळी पुलगेट येथील महात्मा गांधी बसस्थानक येथे ‘साथ चल’ हा उपक्रम झाला. ‘फिनोलेक्स केबल्स’ या उपक्रमाचे प्रायोजक होते. या उपक्रमांतर्गत ‘वारी विठुरायाची आणि पर्यावरण संवर्धनाची’ अर्थात ‘पर्यावरण वारी’चा संकल्प करण्यात आला. पालखी सोहळ्यातील वारकरी आणि उपक्रमात सहभागी झालेल्या शहरवासीयांना संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे यांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली. याप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, आदी उपस्थित होते. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात सक्रिय असलेल्यांनी यात सहभाग घेतला. ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पहाटेपासूनच नागरिकांची लगबग सुरू झाली होती. पुलगेट येथे पोहोचलेल्या नागरिकांनी वारकऱ्यांसह ‘पुंडलिका वरदे हरी विठ्ठल’चा जयघोष करत टाळ-मृदंगांवर ताल धरला होता. कपाळी चंदनाचा टिळा लावून आणि हाती भगव्या पताका घेतलेल्या नागरिकांमुळे वातावरण भक्तीमय झाले होते. शपथ घेतल्यानंतर ही ‘पर्यावरण दिंडी’ काही काळासाठी पालखी सोहळ्यात सहभागी झाली. पुणेकरांनी वारकऱ्यांसमवेत काही पावले चालत वारी अनुभवण्याचा प्रयत्न केला. ‘ज्ञानोबा तुकाराम’, ‘माऊली माऊली’ अशा जयघोषाने परिसर दुमदुमला होता.

बाळगोपाळांचा जयघोष
पालखीत सहभागी झालेले बाळगोपाळ आपल्या आई-वडिलांसह ‘सकाळ''च्या उपक्रमात सहभागी झाले. कपाळी गंध, गळ्यात उपकरणे आणि हातात टाळ अशा वेशभूषेतील मुले प्रत्येक वारकऱ्याचे लक्ष वेधून घेत होती. दिंडीत चालणाऱ्या अनेक महिला मायेने या मुलांच्या डोक्यावरून हात फिरवत असल्याचे दिसत होते. ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा अखंड जयघोष ही मुले करीत होती. बोबड्या बोलातून हा जयघोष ऐकणारे येथे रेंगाळत होते. त्यांच्या सोबत ते सेल्फी घेत होते. त्यांचे रिल्स करून सोशल मीडियावर टाकत होते.

भाव-भक्तीचा मेळा
हा उपक्रमात विविध धर्मीय नागरिक सहभागी झाले होते. ‘ज्ञानराज'' आणि जगद्गुरू रथात पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ होताना पुण्यनगरीमध्ये हा भाव-भक्तीचा हा मेळा फुलला होता. संतांचे विचार हे लोककल्याणाचा शाश्वत विचार आहे. हिंसा, धर्मद्वेष, एकमेकांवरील अविश्वास यातून मुक्तीचा मार्ग म्हणजे संतांचे विचार. प्रेम, क्षमा आणि करुणा हा संतवाणीतील उदात्त विचार अंगिकरणाचा प्रेरणा ‘साथ चल’ उपक्रमातून मिळाली.

ध्यास विठ्ठलाचा, मार्ग पर्यावरणाचा
‘‘तुमचा कार्यक्रम बघितला आणि आता प्लॅस्टिक न वापरण्याचा निर्धार केला. या पुढच्या वारीमध्ये ध्यास विठ्ठलाचा राहील पण, मार्ग पर्यावरणाचा असेल,’’ अशा शब्दात सांगली येथून संत तुकाराम महाराज यांच्या दिंडीत सहभागी झालेल्या सुमती पाटील यांनी व्यक्त केला. ‘साथ चल’ उपक्रमाच्या वेळी त्या पूलगेटवर होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनासाठी केलेली भाषणे ऐकली. डॉक्टरांनी दिलेला संदेश वाचला. मुलांनी पर्यावरण रक्षणासाठी लावलेले बॅनर बघितले. आता माझ्या गावातही हाच प्लॅस्टिक न वापरण्याचा संदेश देणार आहे.’’

क्षणचित्रे
- विठ्ठलाच्या नामघोषाने अवघा परिसर भक्तीमय
- वारकऱ्यांनीही घेतली पर्यावरण संवर्धनाची शपथ
- शहरातील सर्व संस्था-संघटनांचा भरघोस प्रतिसाद
- सर्वधर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
- पारंपरिक वेशभूषेतील नागरिकांनी वेधले लक्ष
- ‘साथ चल’ उपक्रमाच्या निमित्ताने नागरिकांनी साधली वारीत चालण्याची संधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com