विद्यार्थ्यांचे भावविश्व उमटले कागदावर!! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांचे भावविश्व उमटले कागदावर!!
विद्यार्थ्यांचे भावविश्व उमटले कागदावर!!

विद्यार्थ्यांचे भावविश्व उमटले कागदावर!!

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : कोरोनाचे संकट कमी झाले असले तरीही खबरदारी म्हणून बॅंकेत, बाजारपेठेत मास्क घालून जाणारे नागरिक... कोविड योद्धांवरील पोस्टर, एवढंच नव्हे जीवसृष्टी, ऑनलाइन शाळा, बागेतील दृश्य यांसारखे बरंच काही मनाच्या गाभाऱ्यात साठविलेलं विद्यार्थ्यांनी आज ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’च्या निमित्ताने कागदावर उतरवलं. स्पर्धेचे औचित्य साधून रंग-रेषांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी आपलं भावविश्व कोऱ्या कागदावर उमटवत आपल्या अफाट कल्पनांच्या दुनियेची सफर घडविली.
सकाळ चित्रकला स्पर्धेचे ‘मराठी डिजी माध्यम’ हे शैक्षणिक पार्टनर आहेत, तसेच ही स्पर्धा ‘कोलगेट’च्या सहकार्यातून होत असून ‘रिलायन्स स्मार्ट बाझार’ हे सहयोगी प्रायोजक आहेत. रविवार म्हटलं की खरंतर हक्काच्या सुट्टीचा दिवस. परंतु हा रविवार विद्यार्थ्यांसाठी मोठ्या उत्साहाचा ठरला. विद्यार्थ्यांनी सकाळी लवकर उठत आपल्या बॅगेत रंगपेटी, रंगीत पेन्सिल्स्‌, रंगीत खडूच्या मोठ्या पेट्या असे साहित्य भरले अन्‌ आपलं केंद्र असलेली शाळा गाठली. स्पर्धा सुरू होताच हातात कॅनव्हास आणि चित्रकला स्पर्धेचे विषय असणारा कागद विद्यार्थ्यांच्या हातात पडला. प्रत्येक गटाला चार ते पाच विषयांचे पर्याय देण्यात आले होते. त्यातील आपल्या सगळ्यात आवडत्या, जिव्हाळ्याचा पर्याय निवडत विद्यार्थ्यांनी चित्र काढायला सुरवात केली. शहराच्या मध्यवर्ती भागासह येरवडा, खराडी, वाघोली, धनकवडी, कात्रज, कोथरूड, वारजे, बावधन, बिबवेवाडी अशा विविध भागांतील शाळांमध्ये ही स्पर्धा मोठ्या चैतन्यमय वातावरणात झाली.
शालेय विद्यार्थ्यांच्या मनातील भावना प्रत्यक्षात कागदावर उमटविणारी अशी ही स्पर्धा ठरली. स्पर्धेत सर्वात लहान गट असणाऱ्या इयत्ता पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांनी आपले आवडते कार्टून, वाढदिवसाचा आकर्षक रंगीबेरंगी केक आणि सगळ्यात आवडते प्राणी संग्रहालय अशा चित्रांना प्राधान्य दिले. तर त्यापुढील विद्यार्थी (म्हणजेच तिसरी, चौथीचे विद्यार्थी) ऑनलाइन शाळा, फिश टॅंकमधील मासे, बागेतील दृश्य अशा विश्वात रममाण झाले अन्‌ ते कॅनव्हासवर उतरविले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मात्र ‘पोस्टर डिझाईन’साठी दिलेल्या विषयांमध्ये रस दाखविला. ही चित्रकला स्पर्धा सकाळी नऊ ते साडेदहा आणि सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेबारा अशा दोन टप्प्यांत घेण्यात आली. पहिली ते दुसरी, तिसरी ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी अशा पाच गटांत ही स्पर्धा झाली.

‘सकाळ’वरील प्रेमाची प्रचिती
शहर आणि उपनगरातील शाळांनी स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी होत ‘सकाळ’समवेत असणारे ऋणानुबंध जपले. वाघोली येथील विष्णुजी शेकोजी सातव शाळेने या स्पर्धेला ३८ वर्षे झाल्याच्या निमित्ताने त्याचपद्धतीने विद्यार्थ्यांची स्पर्धेतील आसन व्यवस्था केली. नऱ्हे येथील होरायझन स्कूलने ‘सकाळ चित्रकला स्पर्धेला जाऊ या’ अशा आशयाचा केलेला सेल्फी पॉइंट आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. येरवड्यातील गेनबा सोपानराव मोझे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेने ‘जी २० सकाळ’ अशा अक्षरात विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था केला. बिबवेवाडी येथील विश्वकर्मा विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘सकाळ’ अक्षरात बसण्याची व्यवस्था केली होती. शाळांनी मोठ्या उत्साहाने जय्यत तयारी करत स्पर्धेत सहभाग नोंदविला.

विद्यार्थ्यांमध्ये रंगली मजेशीर चुरस
स्पर्धेची वेळ होताच दिलेल्या विषयामधून आपल्या आवडीचे चित्र काढण्यास विद्यार्थ्यांनी सुरवात केली. घड्याळ पुढे सरकत असताना चित्र पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांची सुरू असलेली लगबग... रंगपेट्या, खडू एकमेकांना ‘शेअर’ करणं... चित्र काढताना शेजारच्यांच्या चित्रात डोकावणं अन्‌ त्याच्यापेक्षा आपलं चित्र अधिक चांगलं व्हावं म्हणून पुन्हा आपल्या चित्रात रमणं... रंगलेली बोट एवढंच नव्हे रंग लागलेले कपडे... एकमेकांच्या रंगपेट्यांमध्ये नकळत जाणारे हात अन्‌ निर्माण होणारे छोटेखानी रुसवे-फुगवे अन्‌ क्षणार्धात विसरून जाणं... पूर्ण झालेल्या चित्रांसमवेत सेल्फी काढणं, किंवा चित्राचा फोटो काढणं, अशा उत्साहपूर्ण वातावरणात ही स्पर्धा रंगली.

विद्यार्थी म्हणतात...
मी इयत्ता दुसरीत असल्यापासून ‘सकाळ’च्या चित्रकला स्पर्धेत
सहभाग घेत आहे. आज मी दहावीत शिकत आहे. चित्र काढायला आवडते, म्हणून स्पर्धेत भाग घेते. मैत्रिणीसोबत शाळेच्या प्रांगणात चित्र काढण्याचा आनंद खूप वेगळा असतो.
- अस्मिता वणवे, इयत्ता दहावी

सकाळ चित्रकला स्पर्धेत ‘कोरोना योद्धा’ हा विषय देऊन ‘सकाळ’ने पुन्हा एकदा सर्वांना सतर्क आणि सजग राहण्यास सुचवले आहे. आम्ही देखील अजूनही मास्कचा वापर नियमितपणे करत आहोत. केवळ स्पर्धा म्हणून नव्हे, तर चित्र काढायला आवडते म्हणून स्पर्धेत सहभागी झाले आहे.
- श्रुती देवरे, इयत्ता दहावी