आम्ही मुकलो.. पण मुलं अभिव्यक्त होताहेत.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आम्ही मुकलो.. पण मुलं अभिव्यक्त होताहेत..
आम्ही मुकलो.. पण मुलं अभिव्यक्त होताहेत..

आम्ही मुकलो.. पण मुलं अभिव्यक्त होताहेत..

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः आमच्या बालपणी चित्रकला स्पर्धेच्या अशा भव्य आयोजनाला आम्ही मुकलो.. पण आमची मुले ‘सकाळ’च्या चित्रकला स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे अभिव्यक्त होत आहेत, ही आमच्यासाठी खरंच आनंदाची गोष्ट आहे, अशी उस्फूर्त प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.

‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेसाठी केवळ मुला-मुलींची लगबग होत नव्हती, तर त्यांना स्पर्धेच्या ठिकाणी सोडण्यासाठी आलेल्या पालकांचीही लगबग सुरू होती. आवडते रंग, पेन्सिल, ब्रश, पाण्याची बॉटल, सर्व काही घेतलंय का नाही, याची खातरजमा करत पालक स्पर्धा केंद्रावर दाखल झाले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा सहभाग पाहता पालक काहीसे अचंबित होत होते. मात्र, आपल्या पाल्याला या भव्य आयोजनाचा भाग होता आल्याचे समाधानही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
बिबवेवाडीच्या रूपाली सतीश शिळीमकर सांगतात, ‘‘माझ्या पाल्याने पहिल्यांदाच स्पर्धेत भाग घेतला आहे. कोरोनामुळे दोन वर्षे स्पर्धाच झाली नाही. यंदा मात्र आवर्जून त्याने सहभाग घेतला. चित्रकलेमुळे हस्ताक्षर सुंदर तर होते. त्याचबरोबर त्यांना अभिव्यक्तही होता येत आहे.’’
आमच्या लहानपणी फार कमी संधी मिळायची; आता पाल्यांसाठी ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ हक्काचे व्यासपीठ असल्याची भावना अनेक पालकांनी व्यक्त केली.

शाळेच्या व्यतिरिक्तही मुलांची एक अभिरुची असते. सकाळ चित्रकला स्पर्धेमुळे कलेला वाव मिळाला असून, मुलांना पुढे जाण्याबरोबरच आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. मला विश्वास आहे, या भव्य आयोजनाचा विद्यार्थ्यांना नक्की फायदा होईल.
- अनुजा घोडके, बालाजीनगर

चित्रकला म्हटलं की प्रचंड उत्साह असतो. माझा पाल्य चौथीला असून, नवीन चित्र काढायला भेटणार असल्यामुळे निश्चितच ती आनंदी आहे. सकाळ चित्रकला स्पर्धेमुळे एक प्रोत्साहन मिळाले आहे.
- प्रशांत ओहोळ, इंदिरानगर

सारसबागेत झालेल्या चित्रकला स्पर्धेत माझ्या मोठ्या मुलाने भाग घेतला होता. माझ्या जावेच्या मुलींनीही स्पर्धेत भाग घेतला होता. मुलांना आम्ही या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नेहमी प्रोत्साहित करतो.
- अमृता गांधी, बिबवेवाडी

चित्रकला ही अभिव्यक्त होण्याचे उत्तम माध्यम आहे. मुलांना यामुळे स्वतःत सकारात्मक बदल तर करता येईल, त्याचबरोबर एका स्पर्धेचाही अनुभव गाठीशी मिळणार आहे.
- स्नेहा केसकर