म्हाडाकडून फक्त दोन हजार अर्जांची छाननी पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाडाकडून फक्त दोन हजार अर्जांची छाननी पूर्ण
म्हाडाकडून फक्त दोन हजार अर्जांची छाननी पूर्ण

म्हाडाकडून फक्त दोन हजार अर्जांची छाननी पूर्ण

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : गरजूंना फायदा मिळावा, यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) नवी संगणकप्रणाली लागू केली खरी, परंतु त्याचा त्रास नागरीकांना होत असल्याचे समोर आले आहे. म्हाडाच्या ५ हजार ९१५ घरांसाठी आतापर्यंत ५९ हजार ७४६ जणांनी अर्ज केले असले, तरी केवळ १ हजार ८७१ नागरिकांच्या अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नवी संगणकप्रणालीचा त्रास म्हाडाबरोबरच नागरीकांना देखील सहन करावा लागत असल्याचे समोर आले आहे.

म्हाडाकडून यंदा प्रथमच इंटिग्रेडेट लॉटरी मॅनेजमेंट सिस्टीम (आयएलएमएस) २.० या नवीन संगणकप्रणालीद्वारे सोडत काढण्याचा काढण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये घरांसाठी अर्ज करताना पॅनकार्ड, आधारकार्ड, रहिवास दाखला (डोमेसाईल), उत्पन्नाचा दाखला किंवा आयकर प्रमाणपत्र, शपथपत्र, छायाचित्र, ई-स्वाक्षरी आणि स्वीकृतीपत्र आदी सात कागदपत्रे अपलोड करायची आहेत. ती अपलोड केल्यानंतर लगेचच तुम्ही सोडतीसाठी पात्र आणि अपात्र ठरविण्याची सुविधा या प्रणालीमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे नागरीकांना अर्ज भरल्यानंतरच आपण पात्र आहे की नाही, हे कळण्यास मदत होणार आहे. परंतु या प्रणालीमध्ये अर्जदारांच्या कागदपत्रांच्या छाननीला मोठा विलंब लागत असल्याचे दिसून आले आहे.
पाच हजार ९१५ घरांसाठी आतापर्यंत ५९ हजार ७४६ जणांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी ३३ हजार २९१ जणांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. ३० हजार ६२३ जणांचे पॅन कार्ड प्रमाणीकरण झाले आहे. १७ हजार २५६ जणांनी रहिवास दाखला जोडला असून त्यापैकी ८ हजार १३३ जणांचे रहिवास दाखल्यांचे प्रमाणीकरण झाले आहे, तर ९ हजार १२३ जणांनी जुने रहिवास दाखले जोडले आहेत. दहा हजार ४२० जणांनी उत्पन्नाचे दाखले जोडले असून त्यापैकी ७ हजार ५३५ जणांचे दाखले प्रमाणित झाले आहेत. पूर्ण भरलेले ५ हजार ९७९ अर्ज असून त्यापैकी केवळ १ हजार ८७१ अर्जधारकांच्या कागदपत्रांची छाननी पूर्ण झाली आहे. या गतीने छाननी होत असल्यामुळे दाखल झालेल्या सर्व अर्जांसाठी किती कालावधी लागणार हे सांगता येत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

म्हाडा पुणे मंडळाच्या ऑनलाइन सोडतीसाठी आतापर्यंत प्राप्त अर्जांपैकी पूर्ण प्रक्रिया झालेले सहा हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांमध्ये संबंधित अर्जदारांनी जोडलेल्या कागदपत्रांचे प्रमाणीकरण निश्चित करण्यात आले आहे.
- जितेंद्र जोशी, मुख्य अभियंता, आयएलएमएस प्रणाली