
आयकर अधिकारी असल्याचे सांगून दुसऱ्या पत्नीची फसवणूक
पुणे, ता. २२ ः पत्नीचा ब्रेन ट्युमरने मृत्यू झाल्याची बतावणी करत फेसबुकवर ओळख झालेल्या तरुणीशी लग्न करणाऱ्या तसेच तिचा मानसिक छळ करणाऱ्या तोतया आयकर अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लोणीकंद पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. बंडु वसंत जाधव (वय ३७, रा. बोरगाव, ता. कवठे महांकाळ, जि. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ३५ वर्षीय महिलेनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत महिला ही आरोपी बंडू जाधव याची दुसरी पत्नी आहे. एप्रिल २०१८ मध्ये फिर्यादी व जाधव याची फेसबुकद्वारे ओळख झाली होती. त्याने पीडितेला त्याच्या पत्नीचा ब्रेन ट्युमरने मृत्यू झाल्याचे सांगितले होते. तसेच त्याने आपली ओळख कोल्हापूर येथील महेश जाधव असल्याची व आपण आयकर अधिकारी असल्याचे सांगून पहिली पत्नी जिवंत असताना फिर्यादीबरोबर लग्न केले होते. याच दरम्यान फिर्यादीशी वारंवार वाद घालून सातारा, सांगली, आव्हाळवाडी तसेच कोल्हापूर येथील कळंब येथे फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला. दरम्यान, फिर्यादीने केलेल्या चौकशीत जाधव याचे पहिले लग्न झाल्याचे व त्याच्या पत्नीचा ब्रेन ट्युमरने मृत्यू झाल्याचे खोटे सांगितल्याचे निष्पन्न झाले.यानंतर पीडित महिलेने पोलिसात गुन्हा दाखल केला.