आयटी हबची वाढतेय व्याप्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयटी हबची वाढतेय व्याप्ती
आयटी हबची वाढतेय व्याप्ती

आयटी हबची वाढतेय व्याप्ती

sakal_logo
By

सनील गाडेकर ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २३ : मोठ्या प्रमाणातील कुशल मनुष्यबळ, पुरेशा पायाभूत सुविधा, कंपनी सुरू करण्यास व्यावसायिकांची पसंती, विद्यार्थी घडविण्यासाठी असलेल्या अनेक नामांकित शिक्षण संस्था आणि नोकरीसाठी पसंतीचे असलेले शहर यामुळे पुण्यातील आयटी क्षेत्राची झपाट्याने वाढ होत आहे.

आयटीला बूस्टर मिळण्यासाठी प्रयत्न
माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रासाठी आवश्‍यक असलेले पोषक वातावरण यात महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे हिंजवडीपासून सुरू झालेला शहरातील आयटी क्षेत्राचा प्रवास आता सर्व पुण्यात पसरला आहे. सातत्याने सुरू होत असलेल्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्या, मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला रोजगार आणि वाढत्या आयटीयन्समुळे त्यांना सुविधा पुरविणाऱ्या बांधकाम क्षेत्रासह विकसित झालेले इतर अनेक क्षेत्र... या सर्व बाबींमुळे पुण्याचे आयटीबाबतचे स्थान जगभरात आणखी मजबूत स्थितीत पोचले आहे. आयटीला बूस्टर मिळण्यासाठी आवश्‍यक असलेले प्रयत्न सरकारी पातळीवरही केले जात आहे.

मुलाखतीपासून काम सोडण्यापर्यंत अनेक बदल
कोरोनामुळे या क्षेत्रातील कामाच्या कल्चरपासून प्रशासनात मोठे बदल झाले आहे. नवीन ठिकाणी नोकरी करायची ठरल्यास तेथे ‘वर्क फ्रॉम होम’ असेल तरच मुलाखतीला जाऊ, असा ट्रेंड आयटीयन्समध्ये आहे. अनेक नवीन पर्याय उपलब्ध झाल्याने स्वीच होण्याचे प्रमाणही वाढले आहे. चांगला पगार मिळावी, केवळ हीच अपेक्षा त्यामागे नसते. मोठ्या पगारासह घरून काम आणि सेटअप खर्च देखील मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आयटी भागात घरांना मागणी
हायब्रीड किंवा वर्क फ्रॉम होममुळे पुण्यात राहत असलेल्या बॅचलर आयटीयन्सची संख्या कमी झाली आहे. मात्र, घर घेण्यास त्यांची पसंती आजही पुण्यास आहे. त्यामुळे आयटी परिसरातील घरांना आजही मोठी मागणी आहे. ४५ ते ९० लाखांच्या दरम्यान किंमत असलेल्या घरांची सर्वाधिक विक्री या भागात होत आहे. त्यामुळे आयटी क्षेत्र बांधकाम क्षेत्राला बूस्टर देणारे ठरत आहे.

आधारित व्यवसायातून रोजगार
आयटीयन्सवर आधारित असलेल्या व्यवसायांत बांधकाम क्षेत्रासह अनेक बाबींचा समावेश आहे. पीजी, लॉन्ड्री, मेस, कॅब, हॉटेल, टपरी, कॅफे, किराणा, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने, बेकरीसह विविध प्रकारचे खाद्यपदार्थ पुरविणाऱ्या व्यावसायिकांना आयटीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आयटी क्षेत्र केवळ आयटीयन्स पुरते मर्यादित न राहता त्याचा व्याप वाढत आहे.

पुण्यातील आयटी हब :
हिंजवडी, औंध, रावेत, बाणेर, बालेवाडी, बावधन, विमाननगर, मगरपट्टा, खराडी आणि कल्याणीनगर

भरतीचे प्रमाण कोरोनापुर्व स्थितीवर
आयटीमधील भरतीचे प्रमाण पुन्हा कोरोनापुर्व स्थितीवर आले आहे. २०१९ अखेरपर्यंत अनेक आयटी कंपन्यांत एकूण मनुष्यबळाच्या २० ते ४० टक्के नवीन कर्मचारी घेतले जात होते. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत हा टक्का १० वर आला होता. मात्र, कोरोनाची लाट ओसरल्यानंतर अनेक कंपन्यांनी ८० टक्क्यांपर्यंत नवीन कर्मचारी घेतले होते. आत ते प्रमाण पुन्हा २० ते ४० टक्क्यांवर आले आहे.

आयटीमधील स्टार्टअपमुळे रोजगार
आयटीमधील भरतीची टक्केवारी पुन्हा पूर्वपदावर आली असली तरही या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. आयटीसंदर्भातील स्टार्टअप यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या काही महिन्यांत पुण्यात सुरू झालेल्या स्टार्टअपची संख्या वाढली आहे. त्यामुळे त्यामाध्यमातून अनेकांना रोजगाराच्या संधी निर्माण होत आहे.


हायब्रीड पद्धतीला का पसंती?
- आयटीयन्सची घरून काम करण्याची मागणी
- कंपन्यांचे ऑॅफिसचे भाडे वाचते
- नवीन कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त जागा घ्यावी लागत नाही
- पिकअप आणि ड्रॉप बंद
- वीजबिल झाले कमी
- देखभालीचा खर्च वाचतो
- अनेक कर्मचाऱ्यांची पसंती


पुण्यात आयटी आणि स्टार्टअपला मोठ्या संधी आहेत. कारण, हे दोन्ही क्षेत्र केवळ पुण्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावर परिस्थिती कशी आहे, त्यावर सध्या आयटीचे भविष्य भरविले जात आहे. रशिया-युक्रेन युद्ध, अमेरिकेतील आर्थिक आणि कोरोनाचे चांगले-वार्इट परिणाम या येथील आयटी कंपन्यांवर दिसून आले. प्रकल्प कमी झाले की रोजगार निर्माती थांबणार, हे प्रत्येक क्षेत्रात होते. तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या स्टार्टअपच्या माध्यमातून सध्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे.
- अनिल पटवर्धन,
माजी अध्यक्ष, हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशन

गेल्या १५ वर्षांत हिंजवडीत झालेले बदल मी अनुभवले आहेत. वाढत्या कंपन्या, त्यामुळे झालेले नागरिकीकरण व त्यातून उदयाला आलेले नवीन उद्योग यामुळे या भागाचे स्वरूप पालटले आहे. गायरान जमिनीवर आज मोठ्या इमारती उभ्या आहेत. या सर्व बदलांचा माझ्या व्यावसायासाठी मोठा फायदा झाला.
- अंकुश रावते, खाद्यपदार्थ विक्रेता, हिंजवडी

राज्यातून झालेली सॉफ्टवेअर निर्यात
वर्ष - रक्कम (लाख कोटीत)
२०२१ - २०१११६
२०२२ - १८३७२९

२०२१-२२ मध्ये राज्यातील नोंदणीकृत एसटीपीआय आणि एसईझेडमधून झालेली सॉफ्टवेअर निर्यात - ११५९२१२ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त


५०० हून अधिक
- पुण्यातील आयटी कंपन्या

६,५०,००० हून अधिक
- रोजगार

३,७५,००० हून अधिक
- हिंजवडीतील आयटीयन्स

आयटीत मागणीमध्ये असलेली कौशल्ये :
१) प्रोग्रॅमिंग लँग्वेज
२) क्लाऊड कॉम्प्युटिंग
३) डेव्हऑप्स
४) आर्टिफिशियल इंटेलिजन्स
५) मशिन लर्निंग
६) डेटा सायंटिस्ट
७) क्लाऊड आर्किटेक्ट
८) ब्लॉकचेन इंजिनिअर