महानाट्यातून उलगडली वैभवशाली इतिहासाची अमृतगाथा
पुणे, ता. २३ : प्राचीन भारतातील चाणक्य-चंद्रगुप्त मौर्य, छत्रपती शिवाजी महाराज यांचा कालखंड, १८५७ चे स्वातंत्र्यसमर, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी यांसारख्या महापुरुषांचे कार्य महानाट्याच्या माध्यमातून पुणेकरांसमोर उलगडले. निमित्त होते शिक्षण प्रसारक मंडळीच्या एस.पी.एम इंग्लिश स्कूल (सदाशिव पेठ)तर्फे आयोजित ‘स्वातंत्र्याची अमृतगाथा’ या महानाट्याचे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त या महानाट्याच्या माध्यमातून प्राचीन भारतापासून ते अगदी आजपर्यंतच्या भारताचा वैभवशाली इतिहास शाळेतील १,१०० विद्यार्थ्यांनी एकाच रंगमंचावर सादर केला. यावेळी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, ज्येष्ठ लेखिका वीणा देव, अभिनेता विराजस कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, शिक्षण प्रसारक मंडळीचे उपाध्यक्ष गजेंद्र पवार, नियामक मंडळाचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, शाळा समितीचे अध्यक्ष अॅड. मिहीर प्रभुदेसाई, शाळेच्या मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सलग दोन तास १५ मिनिटांचे हे महानाट्य असून, भारताचा इतिहास व संस्कृती यानिमित्ताने पुणेकरांनी अनुभवली. शाळेतील बालवाडी ते नववीपर्यंतचे विद्यार्थी यात सहभागी झाले होते. महानाट्याची संकल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी यांची आहे, तर महानाट्याचे लेखन व दिग्दर्शन मीनाक्षी दाबके यांनी केले असून, होनराज मावळे यांनी संगीत दिले आहे. सुधीर अंबी यांनी नेपथ्य केले आहे.
---------------------------