

पुणे, ता. २२ ः शहरात अपघात, बलात्कार, चोरीसारख्या घटना वाढलेल्या असतानाही महापालिका, पोलिस प्रशासन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांकडे दुर्लक्ष करत असेल, तर प्रशासनाला करदात्यांना उत्तर द्यावेच लागेल. सीसीटीव्हींचा योग्य वापर करण्याऐवजी त्यावरून टोलवाटोवली करणे म्हणजे काम टाळण्याचा प्रकार आहे. शहराची काळजी नसणाऱ्यांना राज्यकर्त्यांनी दुसरीकडे पाठवावे. किरकोळ गुन्हेच नव्हे, तर दहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्हींकडे होणारे दुर्लक्ष म्हणजे पुणेकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे, अशा शब्दांत नागरिकांनी सीसीटीव्हींच्या मुद्द्यांवरून प्रशासनाला धारेवर धरले.
शहरातील सीसीटीव्हींच्या देखभाल दुरुस्तीचे काम महापालिकेकडून दोन महिन्यांपासून सुरू आहे. तसेच बंद पडलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीवरून महापालिका व पोलिस प्रशासनाकडून एकमेकांवर टोलवाटोलवी केली जात असल्याचा प्रकार सुरू आहे. त्यावर ‘सकाळ’ने ‘तिसऱ्या डोळ्याकडे कानाडोळा’ या वृत्ताद्वारे प्रकाश टाकला होता. दरम्यान यासंदर्भात नागरिकांनीही आपल्या रोखठोक प्रतिक्रिया थेट ‘सकाळ’कडे नोंदविल्या आहेत. त्यातील निवडक प्रतिक्रिया अशा.
स्मार्ट सिटी अशी ओळख असलेल्या शहरात सीसीटीव्हींच्या देखभाल दुरुस्तीवरून टोलवाटोलवी सुरू असेल तर हा गंभीर प्रकार आहे. एकीकडे शहरातील गंभीर गुन्हे, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही महत्त्वाचे आहेत. गणेशोत्सवापूर्वी सुरू झालेल्या सीसीटीव्ही देखभाल दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, हे गंभीर आहे. किमान दिवाळीपूर्वी तरी सीसीटीव्ही दुरुस्त करावेत.
- आदित्य गायकवाड, धनकवडी
अपघात घडल्यास किंवा अन्य गंभीर गुन्ह्याची उकल करण्यासाठी सीसीटीव्ही महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे एकमेकांकडे बोट दाखवण्यापेक्षा नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची आहे, हे लक्षात घेऊन एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. नागरिकांनीही स्वतः सीसीटीव्ही बसविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
- योगेश राजापूरकर, कोथरूड
नागरिक मोठ्या प्रमाणात कर भरतात. त्यामुळे अन्य सेवासुविधांप्रमाणेच सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे कामही प्रशासनाचे आहे. राज्यकर्त्यांनीही हा टोलवाटोलवीचा प्रकार करणाऱ्यांना थांबवावे. शहराची सुरक्षितता मजबूत करण्यासाठी सीसीटीव्ही किंव अन्य कोणते चांगले पर्याय असतील, तर त्याचा वापर करावा.
- संजय क्षीरसागर, बाणेर
आपल्या शहराला अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी सीसीटीव्हींची गरज आहे. ते केवळ बसवून उपयोग नाही, तर प्रशासनाने देखभाल दुरुस्तीकडेही गांभीर्याने पाहिले पाहिजे. नागरिकांच्या जीवाशी व सुरक्षिततेशी तडजोड करू नये.
- अश्रफ खान, नाना पेठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.