पुण्याला मिळाला ‘आर्मी डे परेड’चा मान

पुण्याला मिळाला ‘आर्मी डे परेड’चा मान
Published on

पुणे, ता. २४ ः समृद्ध इतिहासाचा वारसा असलेल्या पुणे शहराला भारतीय लष्कराच्या स्थापना दिनानिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘आर्मी डे परेड’चा मान मिळाला. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे १५ जानेवारी २०२५ ला हा कार्यक्रम आयोजित केला असून, कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारी सुरू केली आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून लष्कराचा गौरवशाली इतिहास उलगडणार आहे. यानिमित्त भारतीय लष्करातर्फे गोव्यातील ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ (आयएफएफआय) परेडच्या प्रसिद्धीसाठी एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.
भारतीय लष्कराची स्थापना ही १५ जानेवारी १९४९ रोजी झाली. या दिवशी फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांनी भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला. त्या दिवसाचे स्मरण म्हणून १५ जानेवारीला ‘आर्मी डे’ साजरा केला जातो. १९४९ मध्ये ब्रिटिश जनरल सर रॉय बुचर यांच्यानंतर करिअप्पा यांनी भारतीय लष्कराची सूत्रे हाती घेतली. त्याचवर्षी ‘आर्मी डे’ साजरा करण्याची परंपरा सुरू झाली.
लष्करी वारशासाठी ओळखले जाणारे पुण्याचे भारताच्या संरक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान आहे. या वर्षीची ‘आर्मी डे परेड’ खडकी येथील बॉम्बे सॅपर्स (बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप आणि सेंटर) येथे होणार आहे. यात लष्कराचे संचलन हा कार्यक्रम या सोहळ्याचे खास आकर्षण राहणार आहे. चित्तथरारक कवायती, शस्त्रास्त्र प्रदर्शन, हवाई कसरती, आधुनिक शस्त्र प्रणाली प्रदर्शन, प्रत्यक्ष युद्धाची प्रात्यक्षिके आदी कार्यक्रमांचा यात समावेश असणार आहे. परेडच्या अगोदर ‘तुमच्या सैन्याला जाणून घ्या’ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यामुळे नागरिकांना प्रगत शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी मिळेल. देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांशीही संवाद साधता येईल.

सामर्थ्य प्रदर्शित करण्याचा उद्देश
गेल्या काही वर्षांत शासनाने लष्कर दिन, नौदल दिन आणि वायुसेना दिन दिल्लीबाहेर आयोजित करण्याचा नवा पायंडा पाडला आहे. त्यामागे अधिकाधिक लोकसहभागाला प्रोत्साहन देणे, राष्ट्रीय एकात्मता बळकट करणे आणि देशाच्या विविध क्षेत्रांत लष्कराचे सामर्थ्य आणि शिस्त प्रदर्शित करणे हा यामागचा उद्देश आहे. २०२३ मध्ये ‘आर्मी डे परेड’ बंगळूरमध्ये आयोजित केली होती. हा कार्यक्रम राजधानीबाहेर पहिल्यांदाच आयोजित केला. २०२४ मध्ये लखनौमध्ये ‘आर्मी डे परेड’ आयोजित केली होती. त्यानंतर २०२५ मध्ये पुण्यात आयोजित केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com