विशाल अगरवाल यांना दुसऱ्या गुन्ह्यात अटक

विशाल अगरवाल यांना दुसऱ्या गुन्ह्यात अटक

पुणे, ता. २ ः बावधनमधील एका सोसायटीतील ७२ सदनिकाधारकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अगरवाल यांच्यासह त्यांच्या अन्य साथीदारांविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात येरवडा कारागृहात असलेल्या अगरवाल यांना अटक करत मंगळवारी (ता. २) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.
अगरवाल यांनी नॅन्सी ब्रह्मा गृहनिर्माण सहकारी संस्थेतील ७२ सदनिकाधारकांना सोसायटीत विविध सुविधा देण्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्याबदल्यात त्यांच्याकडून वेगवेगळी रक्कम घेऊन सुविधा दिल्या नाहीत. अगरवाल व त्यांच्या अन्य साथीदारांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी सोसायटीच्या जागेत इतर इमारती बांधून सदनिकाधारकांचा विश्वास संपादन करून आर्थिक फसवणूक करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा केल्याचे दिसून येत आहे. त्याबाबत अगरवाल यांच्याकडे सखोल तपास करायचा आहे. सोसायटी बांधकाम करताना मंजूर नकाशा व त्यानंतरच्या नकाशामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आला आहे. सोसायटीधारकांना मानीव अभिहस्तांतरण (कन्व्हेयन्स डिड) करून देणे बंधनकारक असतानाही ते करून देण्यास टाळाटाळ केली. यामागे त्यांचा हेतू काय होता? ७२ सदनिकाधारकांकडून घेतलेल्या रकमेचा कुठे वापर केला? यासह अन्य मुद्द्यांचा तपास करायचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केला.

काय आहे प्रकरण?
- नॅन्सी ब्रह्मा असोसिएट्स या प्रकल्पाचे विकसक असलेल्या अगरवाल व त्यांच्या अन्य साथीदारांनी ७२ सदनिकाधारकांना सदनिका व अन्य सोयीसुविधा देण्यासाठी ठराविक रक्कम देऊन व्यवहार केला होता.
- यात त्यांना नॅन्सी ब्रह्मा गृहनिर्माण सहकारी संस्थेची मालकीची असणारी पार्किंगची जागा व इतर सुविधा देत सोसायटीला कन्व्हेयन्स डिड करून देण्याचे ठरले.
- मात्र सोसायटीच्या सभासदांची कोणतीही परवानगी न घेता अगरवाल व त्यांच्या साथीदारांनी आपापसात संगनमत करून फिर्यादी विशाल अडसूळ यांच्या सोसायटीच्या मालकीच्या जागेवर वॅन्टेज टॉवर व वॅन्टेज हाय या दोन इमारती बांधल्या.
- यात प्रत्येक सोसायटीला एकाच ठिकाणी अ‍ॅमिनिटी स्पेस, मोकळी जागा नकाशामध्ये दर्शवून इतर लोकांच्या मदतीने वेळोवेळी फेरबदल करून नकाशे मंजूर करून घेण्यात आले.
- त्याआधारे सोसायटीच्या जागेत वॅन्टेज टॉवर या ११ मजली इमारतीत ६६ व्यावसायिक कार्यालये काढली, तर वॅन्टेज हाय या १० मजली इमारतीत २७ सदनिका व १८ दुकाने बांधून नॅन्सी ब्रम्हा संस्थेतील सदनिकाधारकांची फसवणूक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com