कथक नृत्याचे बहारदार सादरीकरण

कथक नृत्याचे बहारदार सादरीकरण

Published on

पुणे, ता. ५ ः कथक नृत्यांगना पंडिता रोहिणी भाटे यांच्या शिष्यांच्या अभिजात नृत्य प्रस्तुतीतून रसिकांसमोर जणू समग्र ‘रोहिणी’ घराणे उलगडले. पालखी सोहळ्याच्या आगमनाने पुण्यनगरी दुमदुमली असताना कलेचा वारसा पुढे नेणाऱ्या ‘नृत्यारोहिणी’च्या आनंदडोहात अवघा शिष्यवृंद एक झाला होता.
निमित्त होते, प्राजक्ता राज यांच्या आरोहिणी आर्ट वेल्फेअर ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित ‘नृत्यरोहिणी’ या दोन दिवसीय महोत्सवाचे. पं. रोहिणी भाटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नृत्यभारतीतर्फे वर्षभर सुरू असणाऱ्या ‘रोहिणीद्युति’अंतर्गत हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी रोहिणी भाटे यांच्या स्नुषा व ज्येष्ठ कथक नृत्यांगना शमा भाटे, मनीषा साठे, रोहिणी भाटे यांचे सुपुत्र सनत भाटे, माजी खासदार श्रीनिवास पाटील, रोहिणी भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या रोशन दात्ये, अमला शेखर, नीलिमा अध्ये आदी उपस्थित होते.
महोत्सवाच्या पहिल्या सत्रात प्राजक्ता राज यांच्या रचनांचे सादरीकरण झाले. दुसऱ्या सत्रात जर्मन दिग्दर्शिका कॅरोलिन डॅसेल यांनी २५ वर्षांपूर्वी तयार केलेला ‘काल और अवकाश’ (टाइम अँड स्पेस) हा माहितीपट दाखवण्यात आला. या वेळी नीलिमा अध्ये यांनी अनौपचारिक संवाद साधत रोहिणी भाटे यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू उलगडले. तिसऱ्या सत्रात नृत्यभारतीच्या ज्येष्ठ शिष्यांचा नृत्याविष्कार रंगला.
नीलिमा अध्ये, आसावरी पाटणकर, राजश्री जावडेकर, आभा वांबुरकर, आभा औटी, मनीषा अभय, ऋजुता सोमण, शर्वरी जमेनिस, प्राजक्ता राज यांच्यासह त्यांच्या शिष्यांनी सादरीकरण केले. अर्पिता वैशंपायन, अर्थव वैरागकर (गायन), निखिल फाटक, कार्तिकस्वामी दहिफळे (तबला), कृष्णा साळुंके (पखवाज), यशवंत थिट्टे , अमेय बिचू (संवादिनी), धवल जोशी (बासरी) आणि आसावरी पाटणकर (पढंत) यांनी नृत्यांगनांना समर्पक साथसंगत केली. सूत्रसंचालन नृपा सोमण यांनी केले.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.