नव्या बदलीचे ठिकाण आवडेना

नव्या बदलीचे ठिकाण आवडेना

Published on

प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३ ः राज्यातील चार प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी पदभार स्वीकारला नसल्याने परिवहन आयुक्तांनी अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. गुरुवार (ता. ४) पर्यंत कार्यालयात रुजू होण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. यात पुणे आरटीओ कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून काम केलेले संजीव भोर यांचादेखील समावेश आहे. चारपैकी एका अधिकाऱ्याने नोटीस मिळाल्यानंतर नव्या ठिकाणचा पदभार स्वीकारला आहे. परिवहन आयुक्तांनी नोटीस दिल्याने परिवहन विभागात खळबळ माजली आहे.
परिवहन विभागातील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे ६ जूनला पदोन्नतीचे आदेश निघाले होते. या वेळी त्यांची बदलीदेखील करण्यात आली होती. मात्र काही अधिकाऱ्यांनी आपल्या आवडीच्या ठिकाणी नियुक्ती झाली नसल्याने नव्या ठिकाणी हजरच झालेले नाही. त्याला आता जवळपास एक महिना होत आला आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी पदभार न घेतल्याने परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी मंगळवारी नियुक्त न झालेल्या अधिकाऱ्यांना नोटिसा काढल्या आहेत. यात त्यांना दोन दिवसांत पदभार स्वीकारण्याचा आदेश दिला आहे.

यांना दिली नोटीस
अधिकाऱ्यांचे नाव- नियुक्तीचे ठिकाण
- दीपक पाटील-जळगाव
संजीव भोर-छत्रपती संभाजीनगर
श्याम लोही-चंद्रपूर
विजय काटोळे- नागपूर (ग्रामीण)
- विजय काटोळे यांना नोटीस मिळताच त्यांनी मंगळवारी नागपूर ग्रामीणचा पदभार स्वीकारला

आता तरी चिठ्यांचा खेळ थांबणार का
परिवहन विभागाने पारदर्शकतेचे ढोंग करीत परिवहन विभागातील बदल्या ऑनलाइन करण्यावर भर दिला. यामुळे बदली प्रक्रियेत पारदर्शकता येईल अशी पुष्टी जोडली. मात्र ऑनलाइनच्या नावाखाली परिवहन आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी नावाची चिट्टी टाकून बदल्या केल्या आहेत. ज्या अधिकाऱ्यांनी नियुक्तीचा आदेश येऊनही पदभार स्वीकारला नव्हता, ते पुन्हा दुसऱ्या जागी बदली करण्यासाठी आग्रही होते. मात्र एक-दोन अधिकाऱ्यांमुळे नव्या बदलीचे ‘गणित’ चुकले. परिणामी परिवहन आयुक्तांनी नोटीस काढून तत्काळ नेमून दिलेल्या ठिकाणी रुजू होण्याचा आदेश दिला आहे.

नेमून दिलेल्या ठिकाणचा पदभार न स्वीकारल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस दिली आहे. नोटिशीनंतर दोन दिवसांत पदभार स्वीकारण्यास सांगितले आहे. जे पदभार स्वीकारणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त, परिवहन विभाग, मुंबई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.