श्रीमंताची ‘गरीब’ होण्यासाठी धडपड

श्रीमंताची ‘गरीब’ होण्यासाठी धडपड

Published on

पुणे, ता. ३ ः पुण्यात तीन फ्लॅट तरीही पुणे महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचे कार्ड मिळावे यासाठी एका नागरिकाने आरोग्य विभागात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याची मागणी मान्य होत नसल्याने त्याच्या मदतीसाठी आलेल्या नगरसेवकाने अधिकाऱ्यांवर दबाव टाकला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नियमांवर बोट ठेवून योजनेचा लाभ देण्यास नकार दिल्याने सकाळी महापालिकेत चांगलाच तमाशा झाला.
पुणे महापालिकेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी शहरी गरीब योजनेतून दोन लाखापर्यंत मदत केली जाते. त्यासाठी एक लाख ६० हजार रुपयांची उत्पन्नाची मर्यादा आहे. अनेक श्रीमंत नागरिक बनावट उत्पन्नाचा दाखल आणून या योजनेचा फायदा घेत असल्याने गरजवंत नागरिकांसाठी निधी शिल्लक राहत नव्हता. त्यामुळे महापालिकेने शहरी गरीब योजनेची सर्व माहिती ऑनलाइन केली. त्यामध्ये मिळकतधारकांची माहिती जोडण्यात आली आहे. तसेच उत्पन्नाचा दाखल बनावट आहे की खरा आहे हे देखील तपासले जात आहे. महापालिका भवनातील आरोग्य विभागात शहरी गरीबचे कार्ड काढण्यासाठी बावधन परिसरातील एक व्यक्ती आली. त्यांनी अर्ज केल्यानंतर अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्यावेळी त्यांच्या नावावर तीन फ्लॅट असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही असे सांगितले. त्यावरून त्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तरीही अधिकारी ऐकत नसल्याने तेथे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी नगरसेवक तेथे आले. त्यांनीही कार्डसाठी दबाव आणला. पण अधिकाऱ्यांनी नकार दिल्याने पुन्हा गोंधळ सुरू झाला. अखेर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या दबावाला बळी न पडता संबंधित नागरिक या योजनेस पात्र नाहीत, आमची सिस्टीम त्यांचा अर्ज मान्य करू शकत तुम्ही ऐकणार नसाल तर पोलिसांकडे तक्रार देऊ असा इशारा देतात माजी नगरसेवकासह अर्जदाराने काढता पाय घेतला.

शहरी गरीब योजनेच्या अटींचे उल्लंघन होत असल्याने संबंधित नागरिकास कार्ड दिले नाही, त्यामुळे त्यांनी गोंधळ घातला.
- डॉ. कल्पना बळिवंत, प्रमुख, आरोग्य विभाग, पुणे महापालिका

यापूर्वीही अनेकदा वाद
शहरातील लोकप्रतिनिधी त्यांच्या प्रभागातील मतदारांना शहरी गरीब योजनेतून मदत मिळवून देतात. त्यात अनेकजण खरेच गरीब असतात. पण काही जण उत्पन्नाचा बनावट दाखला घेऊन कार्ड काढायचा प्रयत्न करतात. अनेकांच्या गळ्यात सोन्याच्या साखळ्या, महागडे मोबाईल असून देखील ते गरीब असल्याचे सिद्ध करतात. पण ज्यांचा अडवणूक होते, त्यावरून यापूर्वी माननीय आणि अधिकारी यांच्यात वाद झालेले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.