कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

Published on

पुणे, ता. ३ : मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे असल्याने राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पावासाने उसंत घेतल्याचे चित्र आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर गुरुवारी (ता. ४) जोरदार सरींची शक्यता आहे, तर विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
बुधवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून आले. कोल्हापुरातील आजरा येथे येथे सर्वाधिक १११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. राज्याच्या अनेक भागांत ऊन-सावल्यांच्या खेळात उन्हाचा चटका वाढला आहे. मॉन्सून पुन्हा सक्रिय होऊन जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या फिरोजपूरपासून रोहतक, लखनौ, बालिया, पूर्णिया, ते मणिपूरपर्यंत सक्रिय आहे. यातच पाकिस्तानपासून बांगलादेशपर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार आहे. गुजरात आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. गुजरात ते केरळ किनाऱ्याला लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने किनाऱ्यालगत ढग जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर गुरुवारी जोरदार पावसाचा, तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरींसह पावसाची उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.