पुण्यात भाजप-काँग्रेस आमने-सामने

पुण्यात भाजप-काँग्रेस आमने-सामने

पुणे, ता. ३ ः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत हिंदूंसंदर्भात केलेल्या वक्तव्याचे पडसाद बुधवारी पुण्यात उमटले. भाजपच्या शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी राहुल गांधींविरोधात पोस्टर लावल्याने त्यावर काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी टीका करत वादग्रस्त विधान केले. त्यामुळे आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनावर जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना बालगंधर्व रंगमंदिराजवळ सावरकर भवनासमोरच अडवून ठेवल्याने पुढील राजकीय संघर्ष टळला.
राहुल गांधी यांनी ‘स्वतःला हिंदू म्हणवून घेणारे सतत हिंसा करतात, असत्य बोलतात,’ असे वक्तव्य लोकसभेत केले होते. यावरून धीरज घाटे यांनी ‘खबरदार हिंदू धर्माला नावे ठेवाल तर समुद्रात फेकून देईन’ या स्वामी विवेकानंद यांच्या वाक्याचा आधार देत फ्लेक्स लावले. त्यावर अरविंद शिंदे यांनी टीका केली. ‘‘भाजपचे शहराध्यक्ष स्वतः पोलिस संरक्षण घेऊन फिरतात. जिवाला धोका असल्याचे सांगून त्यांनी पोलिस संरक्षण घेतले. तू कधी मरशील हे तुला माहिती नाही. कारण तुझे कर्म तसे आहेत. जी कर्म कराल ते भोगावे लागतं,’’ असे वादग्रस्त विधान शिंदे यांनी केले.
या टीकेमुळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. गांधी आणि शिंदेचा निषेध करण्यासाठी ते संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास काँग्रेस भवनाकडे जाणार होते. त्यामुळे या परिसराला छावणीचे स्वरूप आले. काँग्रेस भवनातही काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले. या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील संघर्ष टाळण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना सावरकर भवनासमोर अडवले. भाजप कार्यकर्त्यांनी तेथेच रस्त्यात बसून राहुल गांधी, अरविंद शिंदेंविरोधात घोषणाबाजी सुरू केली. शिंदेच्या फोटोला चपलेने मारले. अखेर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आंदोलन संपविले.

धीरज घाटे म्हणाले, ‘‘काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी आमच्या कर्माची चिंता करणे हे म्हणजे दारू पिणाऱ्यांनी व्यसनमुक्तीवर भाषण देण्यासारखे आहे. ३५ वर्षांपासून संघाच्या संस्कारात काम केले आहेत. त्यामुळे कर्म काय करावीत हे तुम्ही आम्हाला शिकवू नका.’’

आंदोलनामुळे वाहतूक कोंडी
भाजपचे कार्यकर्ते थेट रस्त्यात बसून आंदोलन करत होते. बालगंधर्व चौकापासून महापालिकेकडे जाणाऱ्या रस्त्यावरची एकाबाजूची वाहतूक पूर्ण बंद झाली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला करण्याऐवजी बॅरिकेट लावून रस्ता बंद केला. त्यामुळे या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. आधीच संध्याकाळी वाहतूक जास्त असताना आंदोलनामुळे त्यात आणखी भर पडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com