शेतकऱ्याने मिळविली बोगस बियाणांची नुकसान भरपाई

शेतकऱ्याने मिळविली बोगस बियाणांची नुकसान भरपाई

पुणे, ता. ४ : खासगी बियाणे कंपनीकडून खरेदी केलेल्या मिरचीच्या बियाणात फसवणूक झालेल्या एका शेतकऱ्याने या कंपनीकडून बोगस बियाणांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळविली आहे. या शेतकऱ्याने सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब करत, या कंपनीकडून रोख २५ हजार रुपये आणि अर्धा किलो मिरची बियाणे, अशी नुकसान भरपाई मिळविली आहे. नुकसान भरपाई मिळविणारे हे शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्याचे शेतकरी सुकाणू समितीचे अध्यक्ष आहेत. बियाणांमध्ये फसवणूक करणाऱ्या कंपन्यांना शेतकरीसुद्धा धडा शिकवू शकतो, हेच यातून सिद्ध झाले आहे.

रोहन घाडगे असे नुकसान भरपाई मिळविणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांची विविध खते व बी-बियाणे कंपन्यांकडून फसवणूक होत असते. या प्रचंड मोठ्या आर्थिक व राजकीय शक्तीच्या कंपन्यांपुढे शेतकरी हतबल ठरतो व त्यातूनच तो सातत्याने माघार घेत असतो. परंतु याला शेतकरी सुकाणू समितीचे पंढरपूर तालुकाध्यक्ष घाडगे हे अपवाद ठरले आहेत.

यासंदर्भात बोलताना घाडगे म्हणाले, ‘‘जालना येथील सफल सीड्स या कंपनीकडून मी सहा एप्रिल २०२४ रोजी ‘सपना’ या जातीचे मिरची बियाणे खरेदी करून, त्याची लागवड केली होती. त्यानंतर मिरचीच्या रोपांनी काही कालावधीपर्यंत खते आणि औषधे यांना चांगला प्रतिसाद दिला. पण साधारण दीड महिन्यानंतर रोपांनी प्रतिसाद देणे बंद केले. त्यामुळे याबाबत कंपनीशी संपर्क साधला. पण कंपनीकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांची प्रत्यक्ष भेट घेतली. तरीही प्रतिसाद मिळेना. शेवटी या सात जून रोजी राज्याच्या कृषी विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली.’’

‘बोकड्या’मुळे ६६ टक्के नुकसान
तक्रारीनंतर कृषी विभागाने १३ जून २०२४ रोजी या मिरची पिकाचा पंचनामा केला. या पंचनाम्यानुसार मिरचीवरील बोकड्या रोगामुळे ६६ टक्के नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला. याउलट ‘सपना’ ही मिरचीची जात बोकड्या या रोगाला कमी प्रमाणात बळी पडते, असा दावा कंपनीने केला होता. सोलापूर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने याबाबतचा अहवाल राज्याच्या कृषी आयुक्तांना पाठविला. या अहवालाच्या आधारे घाडगे यांना झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून रोख २५ हजार रुपये आणि अर्धा किलो मिरची बियाणे मोफत देण्याची तयारी कंपनीने दर्शविल्याचे रोहन घाडगे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या हतबलतेचा फायदा उठवत, अनेक बियाणे कंपन्या या शेतकऱ्यांची फसवणूक करत असतात. मात्र यापुढे शेतकऱ्यांची फसवणूक करता येणार नाही, हाच संदेश या उदाहरणातून शेतकरी सुकाणू समितीने खासगी कंपन्यांना दिला आहे.
- ॲड. श्रीकांत करे, अध्यक्ष, शेतकरी सुकाणू समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com