व्यावसायिक अभ्यासक्रमांचे वेळापत्रक यंदाही कोलमडणार?

व्यावसायिक अभ्यासक्रमांचे वेळापत्रक यंदाही कोलमडणार?

पुणे, ता. ४ : राज्यात अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, परिचारिका अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ‘सीईटी’ परीक्षेचा निकाल लागला असला, तरीही अद्यापि प्रवेश प्रक्रिया जाहीर न झाल्याने लाखो विद्यार्थी-पालकांची चिंता वाढली आहे. जुलैचा पहिला आठवडा संपत आला तरीही प्रवेश प्रक्रिया जाहीर न झाल्याने यंदाही व्यावसायिक अभ्यासक्रमांचे वेळापत्रक कोलमडण्याची चिन्हे आहेत.
देशात ‘नीट’ परीक्षेतील घोटाळ्यानंतर राज्यात ‘एमएचटी सीईटी’ परीक्षेच्या गुणांवरून वाद सुरू झाला. हा वाद निवळत असतानाच आरक्षणाबाबतच्या संदिग्धतेमुळे अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. खरंतर १ ऑगस्टपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणे अपेक्षित आहे. परंतु, यंदाही विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक बिघडण्याची शक्यता आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांपैकी काही परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. निकाल जाहीर होऊन दहा दिवसांहून अधिक कालावधी झाला आहे. मात्र, अद्याप या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही.
सीईटी सेलमार्फत विविध अभ्यासक्रमांसाठी १९ सीईटी परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत. जून महिन्यापासून या सीईटी परीक्षांचे निकाल ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळावर जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत, एमएचटी सीईटी, बी. एस्सी नर्सिंग, एलएलबी (पाच वर्षे), एमएच-डीपीएन/पीएचएन, बी.एचएमसीटी/एम.एचएमसीटी अशा अभ्यासक्रमांचे निकाल सीईटी सेलने जाहीर केले आहेत. तरीदेखील या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया अद्यापि जाहीर करण्यात आलेली नाही. परिणामी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्‍न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे.

पहिल्या सत्राचे गणित बिघडतेय
दरवर्षी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष साधारणत: ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुरू होते. परिणामी, पहिल्या सत्रातील अभ्यासक्रम संपविण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. शिक्षकांना शिकविण्यासाठी, तर विद्यार्थ्यांना विषय समजून घेण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्याचा परिणाम पहिल्या सत्राच्या परीक्षेवर होत असल्याचे दिसून येते. पहिल्या सत्रात सर्व विषयात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाणात घट होते. तर अनेकांना पहिल्या सत्रात ‘एटीकेटी’ लागत असल्याचे निदर्शनास येते.

‘‘बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्यातच जाहीर झाला आहे. त्यापाठोपाठ बहुतांश व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांचे निकालही जाहीर झाले. हे निकाल जाहीर होऊन काही दिवस उलटले तरीही अद्याप प्रवेश प्रक्रिया जाहीर झालेली नाही. परिणामी विद्यार्थी-पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. परंतु, राज्य सरकार आणि प्रशासनाला याचे काहीही पडलेले नाही. राजकीय घडामोडी व्यतिरिक्त राज्य सरकारचे इतर कोठेही लक्ष नाही.’’
- श्रीराम गीत, ज्येष्ठ समुपदेशक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com