उपायुक्तांच्या नावे 
बनावट प्रमाणपत्र

उपायुक्तांच्या नावे बनावट प्रमाणपत्र

Published on

पुणे, ता. ५ ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्तांच्या नावे बनावट प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामध्ये तिघांविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. बनावट प्रमाणपत्र बनविण्यामागील उद्देश काय होता, त्याचा कोणत्या कारणासाठी वापर झाला, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
सहदेव निंभोरे (रा. साकू, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), नीलेश राठोड यांच्यासह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर परिसरातील एक महिला टिआयएटी परीक्षेच्या गुणपत्रिकेचा कागद घेऊन राठोड यांच्या कार्यालयात गेली होती. संबंधित महिलेने सादर केलेल्या कागदावरील बनावट शिक्का, तसेच राठोड यांची बनावट स्वाक्षरी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा गंभीर प्रकार असल्यामुळे राठोड यांनी याबाबत तत्काळ डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी संबंधित महिलेला चौकशीसाठी बोलाविले. चौकशीत आरोपी सहदेव निंभोरे, नीलेश राठोड यांनी प्रमाणपत्र दिल्याचे महिलेने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी महिलेसह निंभोरे, राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकाराद्वारे बनावट प्रमाणपत्राचा वापर शिक्षक भरतीसाठी केला जाणार होता का, अन्य कारणांसाठी वापर होणार होता, आरोपींनी बनावट प्रमाणपत्र तयार करण्याचे नेमके कारण काय आहे, यादृष्टीने पोलिसांकडून तपास केला जात आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक महेश भोसले तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.