योजना ठरली बहिणींची ‘लाडकी’

योजना ठरली बहिणींची ‘लाडकी’

पुणे, ता. ५ : राज्य सरकारच्यावतीने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी यंदापासून सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला महिलांचा पुणे शहर व जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. सरकारने या योजनेच्या काही जाचक अटी शिथिल केल्यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, अवघ्या पाच दिवसांत सुमारे १४ हजार महिलांनी यासाठी अर्ज केले आहेत. अर्ज करण्यासाठी महिला ऑफलाइन अर्ज करण्यास पसंती देऊ लागल्या आहेत.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा प्रत्येकी दीड हजार रुपये देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ ही योजना यंदापासून राज्य सरकारने सुरू केली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यास एक जुलैपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, कमाल पाच एकर शेती, कमाल वयोमर्यादा, उत्पन्नाचा दाखला आणि जन्मतारखेचा पुरावा यांसह आणखी काही अटी काही प्रमाणात शिथिल केल्याने महिलांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, आतापर्यंत शहर व जिल्ह्यातील मिळून एकूण १४ हजार ७५ महिलांनी अर्ज केले आहेत. यामध्ये पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे आठ हजार तर, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सहा हजार ७५ अर्जांचा समावेश आहे. यासाठी आता अंगणवाडी सेविकातर्फेही मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र महिलांना आता ऑॅफलाइन व ऑनलाइन यापैकी कोणत्याही एका पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

या जाचक अटी वगळल्या
- कमाल पाच एकर जमीन धारणा क्षेत्र
- कमाल वयोमर्यादा
- उत्पन्न दाखल्याचे बंधन
- रहिवासी प्रमाणपत्राचे बंधन
- परराज्यातील महिलांचे रहिवासी प्रमाणपत्र

आतापर्यंत प्राप्त झालेले अर्ज
- पुणे व पिंपरी चिंचवड शहर ८०००
- जिल्ह्याचा ग्रामीण भाग ६०७५
- ऑफलाइन प्राप्त अर्ज ११,७५३
- ऑनलाइन प्राप्त अर्ज २३२२

जिल्हा बँकेत खाते उघडण्याची विशेष सोय
शहर व जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा, या उद्देशाने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने खास महिलांसाठी जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमध्ये खाते उघडण्याची विशेष सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अगदी नाममात्र शुल्कात महिलांना जिल्हा बँकेत खाते उघडता येणार आहे.

टपाल कार्यालयातील खातेही चालणार
दरम्‍यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या ज्या महिलांचे पूर्वी टपाल कार्यालयात खाते आहे. अशा महिलांना खास करून या योजनेच्या लाभासाठी अन्य बँकेत खाते उघडण्याची आवश्‍यकता नाही. कारण या योजनेसाठी टपाल कार्यालयातील खातेही चालणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या काही अटी जाचक असल्याचे निदर्शनास आले होते. या अटींमुळे अनेक पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता होती. परंतु आता राज्य सरकारने सर्व जाचक अटी रद्द केल्या आहेत. त्यामुळे महिलांचा प्रतिसाद वाढला आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यात अडचणी येत होत्या. त्या दूर करण्यात आल्या असून, आता ऑफलाइन अर्ज भरण्यास मुभा देण्यात आलेली आहे.
- मोनिका रंधवे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com