अल्पवयीन मुलाने लिहिला वाहतूक समस्येवर निबंध

अल्पवयीन मुलाने लिहिला वाहतूक समस्येवर निबंध

Published on

पुणे, ता. ५ ः कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाने बाल न्याय मंडळात नुकताच ३०० निबंध सादर केला आहे. आता संबंधित अल्पवयीन मुलास वाहतूक पोलिसांसमवेत चौकात थांबून वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे. उच्च न्यायालयाने बाल न्याय मंडळाच्या अटी व शर्ती कायम ठेवण्याच्या दिलेल्या आदेशाप्रमाणे आता वाहतूक नियोजनाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
कल्याणीनगर परिसरात १९ मे रोजीच्या पहाटे झालेल्या भरधाव आलिशान मोटारीच्या धडकेत संगणक अभियंता तरुण-तरुणीला आपला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणी अल्पवयीन मुलाविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर बाल न्याय मंडळाने संबंधित मुलाला तत्काळ जामीन मंजूर केला. त्या वेळी त्याला वाहतूक प्रश्नावर ३०० शब्दांचा निबंध लिहिणे, वाहतूक पोलिसांसमवेत पंधरा दिवस चौकात वाहतूक नियोजन करावे, तसेच व्यसनमुक्तीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात यावे, अशा अटी व शर्ती घालून मुलास जामीन मंजूर केला होता. बाल न्याय मंडळाच्या संबंधित निर्णयाबाबत पुणे पोलिसांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर बाल न्याय मंडळाने मुलाचा जामीन रद्द करून त्याला बालसुधारगृहात ठेवण्याचा आदेश दिला होता.
दरम्यान, मुलाच्या आत्याने त्याच्या जामिनाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने मुलाची बालसुधारगृहातून मुक्तता करून त्याचा ताबा आत्याकडे देण्याचा आदेश दिला होता. उच्च न्यायालयाने मुलाचा जामीन मंजूर करताना बाल न्याय मंडळाने दिलेल्या अटी आणि शर्ती कायम ठेवल्या होत्या. या अटी व शर्तींचे पालन करत मुलाने शहरातील वाहतूक समस्येवर ३०० शब्दांचा निबंध नुकताच बाल न्याय मंडळाकडे सादर केला, अशी माहिती बाल न्याय मंडळातील सूत्रांनी दिली. आता मुलाला पंधरा दिवस वाहतूक पोलिसांसमवेत चौकात थांबून वाहतूक नियोजन करावे लागणार आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध पुणे पोलिस सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून, त्याबाबत राज्याच्या विधी आणि न्याय विभागाकडून पुणे पोलिसांना परवानगी प्राप्त झालेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.