खंडणीप्रकरणी दोन पोलिस निलंबित

खंडणीप्रकरणी दोन पोलिस निलंबित

Published on

पुणे, ता. ६ : सोलापूर रस्त्यावर तेलवाहू टँकर चालकाला अडवून अडीच लाखांची खंडणी उकळणाऱ्या तोतया पत्रकाराच्या संपर्कात असलेल्या गुन्हे शाखेतील दोन पोलिस शिपायांना निलंबित केले. पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी हा आदेश दिला.
पोलिस हवालदार ज्ञानदेव गोरख गिरमकर आणि नाईक शिरीष श्रीहरी गोसावी, अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. २९ जूनला रात्री सोलापूर रस्त्यावर तेलवाहू टँकरचालकाला अडवून तोतया पत्रकार राहुल हरपळे आणि साथीदारांनी अडीच लाखांची खंडणी उकळली. याबाबत अण्णा चौगुले यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हडपसर परिसरात तेलवाहू टँकर पकडला असून, टँकर सोडविण्यासाठी पोलिस तडजोड करत असल्याचा मेसेज वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सोशल मीडियावरील ग्रुपवर आला होता.
दरोडा आणि वाहन चोरीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांना याबाबतची चौकशी करण्याचा आदेश दिला होता. हरपळेने टँकर पकडला, त्यानंतर गोसावी आणि गिरमकर तेथे गेले. त्यांनी याबाबतची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कळविणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली नाही. दोघांनी टँकरची चावी आणि कागदपत्रे ताब्यात घेतली. हरपळेने टँकर सोडवून देण्यासाठी अडीच लाखांची खंडणी उकळली. हरपळे आणि पोलिस कर्मचारी गोसावी, गिरमकर यांच्या मो‍बार्इलची तपासणी केली. तेव्हा हरपळे आणि गोसावी, गिरमकर संपर्कात असल्याचे उघड झाले.

दररोज हजेरी लावावी लागणार :
कर्मचारी गोसावी आणि गिरमकर यांचे वर्तन पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणारे असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यानंतर दोघांना निलंबित करण्याचा आदेश देण्यात आला. निलंबन कालावधीत दोघांना पोलिस मुख्यालयात दररोज हजेरी लावावी लागणार आहे, असे झेंडे यांच्या आदेशात नमूद आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.