नालेसफाईसाठी आता स्पायडर मशिन

नालेसफाईसाठी आता स्पायडर मशिन
Published on

पुणे, ता. ३० ः अडचणीच्या ठिकाणी असलेल्या नाल्यांच्या स्वच्छतेसाठी अत्याधुनिक स्पायडर मशिन वापरली जाणार आहेत. त्यासाठी तीन कोटी ५३ लाख ४२ ८२७ हजार रुपयांच्या पाच निविदांना सोमवारी (ता. ३०) पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईसाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय निविदा काढल्या जातात. अनेक नाल्यांपाशी जेसीबी किंवा पोकलेन ही वाहने पोहचू शकत नाहीत. त्यामुळे स्पायडर मशिन वापरली जाणार आहेत.
पुणे शहरातून सुमारे ३५० किलोमीटर लांबीचे नाले वाहतात. अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये कचरा, राडारोडा टाकला जातो. त्यामुळे प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. अनेक ठिकाणी अतिक्रमणामुळे नाल्याची रुंदी कमी होते. त्यामुळे नाल्याला पूर आल्यानंतर लगतच्या वस्ती, सोसायट्यांमध्ये पाणी जाऊन नुकसान होते. त्यामुळे नालेसफाईसाठी निविदा काढल्या जातात. एप्रिल, मे आणि जून या महिन्यांत नालेसफाई केली जाते. या निविदांची मुदत सहा महिन्यांसाठी असली तरी तीन महिनेच काम केले जाते. त्यामुळे पावसाळ्यानंतर या निविदांचा काही उपयोग करून घेतला जात नाही. असे असताना महापालिकेच्या मलनिःसारण विभागाने स्पायडर मशिनसाठी परिमंडळ निहाय निविदा काढली आहे.
अनेक ठिकाणी नाल्यांची खोली जास्त असल्याने व आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होण्याच्या शक्यतेने मनुष्यबळ लावून काम करता येत नाही. त्यामुळे स्पायडर मशिन लावून सफाई केली जाणार आहे. परिमंडळ एकसाठी ७१ लाख ५८ हजार ७३१, परिमंडळ दोनसाठी ७१ लाख ५८ हजार ७३१, परिमंडळ तीनसाठी ७१ लाख ५८ हजार ९८, परिमंडळ चारसाठी ६७ लाख ८ हजार ६९३ आणि परिमंडळ पाचसाठी ७१ लाख ५८ हजार ५७४ रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली आहे, असे अधिक्षक अभियंता संतोष तांदळे आणि दिनकर गोजारे यांनी सांगितले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com