कोंढव्यातील प्रयोगशाळा 
सुरु होण्याची शक्यता

कोंढव्यातील प्रयोगशाळा सुरु होण्याची शक्यता

पुणे, ता. ६ : पुणे महापालिकेने कोंढवा येथे उभारलेली अत्याधुनिक प्रयोगशाळा चार वर्षांपासून बंद आहे. ती सुरू करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. चार वेळा निविदा काढल्यानंतर तीन संस्थांनी प्रतिसाद दिला. त्यातील एका संस्थेची स्थायी समितीमार्फत निवड केली जाणार आहे. त्यामुळे ही प्रयोगशाळा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अन्न, खाद्यपदार्थ, पॅकिंग केलेले पदार्थ, पाण्याची तपासणी करण्यासाठी २०११ मध्ये ही प्रयोगशाळा उभारली. त्यानंतर सुमारे पावणेआठ कोटी रुपयांची उपकरणे खरेदी केली. एका संस्थेला २०१३ मध्ये ही प्रयोगशाळा चालविण्यास दिली. या वेळी झालेल्या करारात महापालिकेला दरवर्षी सुमारे ५० लाख रुपयांचा फायदा होईल, असे नमूद केले होते. पण प्रत्यक्षात २०१३-१४ ते २०१७-१८ या पाच वर्षांत फक्त १२ लाख ७८ हजार रुपये उत्पन्न मिळाले. तसेच ही रक्कम प्रयोगशाळेचे काम पाहणाऱ्या कनिष्ठ लेखनिकाच्या पगारावर खर्च झाली.
त्यानंतर या संस्थेसोबत नव्याने करार न केल्याने प्रयोगशाळा बंद झाली. २०२२ मध्ये या संस्थेला पुन्हा काम देण्याचा निर्णय घेण्यात आला. पण अनामत रक्कम न भरल्याने प्रयोगशाळा सुरू होऊ शकली नाही. अखेर आरोग्य विभागाने ही निविदा रद्द करून नव्याने निविदा काढण्याचा निर्णय घेतला. तिला तीन वेळा मुदतवाढ दिली; पण एकाही संस्थेने अर्ज भरला नाही. अखेर चौथ्यांदा काढलेल्या निविदेत तीन संस्थांनी निविदा भरली आहे. त्यांच्या कागदपत्रांची छाननी, आर्थिकविषयक बाबी तपासल्यानंतर त्यांचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर केला जाईल. तेथे मान्यता मिळाल्यानंतर ही प्रयोगशाळा सुरू होणार आहे.

कोंढव्यातील प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी चार वेळा निविदा काढली. चौथ्यांदा तीन संस्थांनी अर्ज भरले आहेत. यातील एक निविदा मंजूर झाल्यानंतर या प्रयोगशाळेचे काम सुरू होईल. यात नागरिकांना सवलतीच्या दरात अन्न, खाद्यपदार्थ, तेल, तूप, दूध, पाणी यांसह इतर सर्व पदार्थांच्या गुणवत्तेसंदर्भात तपासणी करून मिळेल.
- डॉ. सारिका फुंडे,
पशुवैद्यकीय अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com