भरवशाच्या मुन्नानेच केला मोहोळचा ‘गेम’

भरवशाच्या मुन्नानेच केला मोहोळचा ‘गेम’

कुख्यात गॅंगस्टर शरद मोहोळची त्याच्याच साथीदारासह इतर हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. ‘मुळशी पॅटर्न’सारख्या घटनेने शहर हादरले. पोलिसांनी मोहोळचा साथीदार मुन्ना ऊर्फ साहिल पोळेकरसह आठ जणांना अटक केली. या हत्येमागे नेमके कोण, त्याची कारणे पोलिस तपासात समोर येतील, परंतु या घटनेनंतर शहरातील गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढणार नाही, याबाबत पोलिसांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. शिवाय, गुन्हेगारीकडे आकर्षित होणाऱ्या तरुणांनीही यातून धडा घेण्याची गरज आहे.

शरद मोहोळ हा मुळशी तालुक्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील. पुण्यात गुन्हेगारी विश्वात दबदबा असलेल्या संदीप मोहोळचा चालक म्हणून शरद मोहोळ सुरुवातीला काम करत होता. संदीप मोहोळने २००६ मध्ये कोथरूडमधील मारणे टोळीमधील सुधीर रसाळची हत्या केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून मारणे टोळीने संदीप मोहोळची हत्या केली. मारणे टोळीची आर्थिक सूत्रे किशोर मारणे सांभाळत होता. त्याचा खून बोडके आणि मारणे टोळीतील संघर्षातून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. गजानन मारणे, नीलेश घायवळ आणि शरद मोहोळ यांच्यात वर्चस्वाच्या वादातून टोळीयुद्धाचा भडका उडाला होता.

लवासानजीक दासवे गावच्या सरपंचाचे अपहरण करून ४७ लाखांची खंडणी वसूल केल्याची घटना २०११ मध्ये घडली. या गुन्ह्यात शरद मोहोळ आणि आलोक भालेरावसह इतर साथीदारांवर ‘मोका’ कायद्यान्वये कारवाई झाली होती. किशोर मारणे हत्येच्या प्रकरणात मोहोळ येरवडा कारागृहात होता. याच कारागृहात अंडा सेलमध्ये संशयित दहशतवादी कातिल सिद्दिकीही होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर घातपात घडविण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून ‘एटीएस’ने सिद्दिकीला अटक केली होती. या अंडा सेलमध्ये कातिल सिद्दिकीचा पायजम्याच्या नाडीने गळा आवळून खून झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी शरद मोहोळ आणि आलोक भालेराव यांच्यावर गुन्हा दाखल केला. परंतु या गुन्ह्यात मोहोळ आणि भालेराव या दोघांची निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर मोहोळ सामाजिक, राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात दिसत होता. परंतु जवळच्या एका साथीदाराकडूनच शरद मोहोळचा घात झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com