महायुतीच्या पदयात्रेत कार्यकर्त्यांचे ‘मोहोळ’

महायुतीच्या पदयात्रेत कार्यकर्त्यांचे ‘मोहोळ’

पुणे, ता. २५ ः पुणे लोकसभेचे महायुतीचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी भव्य पदयात्रा काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी शहरातून व उपनगरांमधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. भगव्या, निळ्या आणि पिवळ्या झेंड्यांनी कर्वे रस्ता गजबजून गेला होता.
मोहोळ यांनी कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून पदयात्रेला सुरुवात केली. त्याचा समारोप डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ झाला. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, धीरज घाटे, माजी आमदार जगदीश मुळीक, दीपक मानकर, बाबू वागस्कर, साईनाथ बाबर, संजय सोनवणे आदी उपस्थित होते.
सकाळी मोहोळ कुटुंबीयांनी औक्षण केल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी ग्रामदैवत श्री कसबा गणपती आणि ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्‍वरीचे दर्शन घेतले. सकाळी साडेदहाच्या सुमारास कोथरूड येथून पदयात्रेला सुरुवात झाली. यात भाजपसह मनसे, शिवसेना, रिपाइंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गळ्यात महायुतीचे उपरणे, हातात झेंडे घेऊन घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्ते, महिलांची संख्या मोठी होती. या वेळी भाजपच्या गाण्यांवर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

गर्दी जमविण्यासाठी बसची व्यवस्था
शहराच्या मध्यवर्ती भागातून महायुतीचे कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते. कँटोन्मेंट, विश्रांतवाडी, येरवडा, बिबवेवाडी, बोपोडी यासह अन्य उपनगरांमधून नागरिकांची गर्दी जमविण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती. माजी नगरसेवकांसह महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना बसमधून आणले होते.

काही वेळासाठीच फडणवीस सहभागी
मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देवेंद्र फडणवीस काल (ता. २४) रात्री पुण्यात मुक्कामासाठी आले होते. सकाळी लवकर पदयात्रेत सहभागी होऊन ते जळगाव येथे जाणार होते. मात्र पदयात्रेला साडेदहाच्या सुमारास सुरुवात झाल्यानंतर ती संथगतीने पुढे सरकत होती. अखेर फडणवीस एसएनडीटी कॉलेजपासून पदयात्रेत सहभागी झाले. त्या वेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष करून त्यांचे स्वागत केले. पुढील कार्यक्रमाला उशीर होत असल्याने आयुर्वेद रस शाळेजवळ फडणवीस आणि मोहोळ हे प्रचाराच्या रथातून खाली उतरून गाडीत बसून थेट उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघून गेले.

सभा घेतली आवरती
फडणवीस, मोहोळ तसेच अजित पवार, शिवाजीराव आढळराव पाटील हे खंडुजीबाबा चौकातील सभेसाठी न थांबता थेट उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुढे निघून गेले. त्यामुळे सभेसाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह महायुतीचे स्थानिक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. उन्हाचा चटका वाढत असल्याने व प्रमुख नेते मंडळी उपस्थित नसल्याने ही सभा आवरती घ्यावी लागली. चंद्रकांत पाटील, मनसेचे नेते बाबू वागस्कर, माजी आमदार जगदीश मुळीक, शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी अवघ्या काही मिनिटांत मनोगत व्यक्त करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सभा व पदयात्रा संपल्याचे जाहीर केले.

खिचडी, गुलाब जाम, ज्यूस अन् पाणी
पदयात्रेचे अंतर जास्त असल्याने मार्गावर कार्यकर्त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ठिकठिकाणी खिचडी, गुलाब जाम देण्यात आले. ऊन जास्त असल्याने थंड ज्यूस, पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.

जेसीबीतून फुलांची उधळण
डेक्कन येथे पदयात्रेच्या स्वागतासाठी आठ जेसीबींमधून फुलांची उधळण करण्यात आली. तसेच क्रेनने ५० फूट उंचीचा हार घालण्यात आला. त्यामुळे
शक्तिप्रदर्शनात आणखी भर पडली.

संविधान रथ, मोदींची गॅरंटी
विरोधकांकडून भाजप संविधान बदलणार असल्याची टीका होत असताना या पदयात्रेत संविधान रथाचा समावेश करण्यात आला होता. त्याचप्रमाणे विकसित भारतासाठी ‘मोदींची गॅरंटी,’ ‘पुन्हा एकदा मोदी सरकार’ अशा घोषणा लिहिलेल्या रथाचाही समावेश होता.

शक्तिप्रदर्शनातील क्षणचित्रे
- पदयात्रेत भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची मोठी उपस्थिती
- पक्षाचे झेंडे घेतलेल्या मनसे आणि रिपाइंच्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी
- ‘पुण्यात फक्त कमळच फुलते,’ असा फलक घेऊन तरुण पदयात्रेत सहभागी
- ‘बटण असं दाबायचं आहे की कधी अयोध्येला गेला, तर आपल्या प्रभू श्रीरामांना नजर मिळवू शकू’ या फलकावर नजरा खिळल्या
- फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल, बँडने स्वागत
- दिव्यांग कार्यकर्त्यांचाही उत्साहाने सहभाग

पुणेकरांमध्ये प्रचंड उत्साह असून, २०१४ व २०१९ मध्ये जनतेने महायुतीवर विश्‍वास ठेवला. गिरीश बापट यांनी शहरात चांगले काम केले आणि आता तरुण तडफदार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ते प्रचंड मतांनी निवडून येतील. महायुतीमध्ये सर्व काही योग्य पद्धतीने सुरू असून, मागील वेळेपेक्षा जास्त जागा निवडून येतील. जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीमागे उभे आहे.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

जेवढी मतदानाची टक्केवारी वाढेल, तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील. गिरीश बापट यांना सव्वातीन लाखांचे मताधिक्य होते. यापेक्षा दुप्पट मताधिक्य मोहोळ यांना द्यायचे असेल, तर प्रत्येक बूथवर ७५ टक्के मतदान होणे व त्यातील ७५ टक्के मतदान महायुतीला होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. संपूर्ण जिल्ह्यात आपले नातेवाईक आहे, त्या सर्वांना महायुतीला मतदान करायला सांगा.
- चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री

पुण्याच्या पुढील ५० वर्षांचा विचार करून शहरात केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने कामे सुरू केली आहेत. पुणे देशातील प्रथम क्रमांकाचे शहर व्हावे, नागरिकांचे जीवनमान उंचवावे, यासाठी पुढील काळात पुणे शहर आणि परिसरात ५० हजार कोटींची कामे केली जाणार आहेत. शिक्षणाच्या आणखी चांगल्या संधी निर्माण होणे, नवीन उद्योग आणणे, रोजगारनिर्मिती करणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे यासाठी मी ही निवडणूक लढवत असून, पुणेकर मला नक्की विजयी करतील.
- मुरलीधर मोहोळ, उमेदवार, भाजप

PNE24U15983, PNE24U15898, PNE24U15985
पुणे ः पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पदयात्रा काढण्यात आली. या वेळी (डावीकडून) उदय सामंत, मोहोळ, देवेंद्र फडणवीस, दीपक मानकर, मेधा कुलकर्णी, रूपाली चाकणकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com