समयसागरजी महाराजांचा ‘आचार्य पद प्रदान’ सोहळा

समयसागरजी महाराजांचा ‘आचार्य पद प्रदान’ सोहळा

जैन धर्माचे ज्येष्ठ धर्मगुरू १०८ श्री समयसागरजी महाराज यांना सर्वश्रेष्ठ असे आचार्यपद प्रदान करण्याचा सोहळा दमोह (मध्य प्रदेश) येथील जैन तीर्थक्षेत्र कुंडलपूर येथे १६ मार्चला झाला. आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे मुनीसंघातील ३५० हून अधिक मुनी, आर्यिका तसेच देश-विदेशातील भाविक उपस्थित होते. या वेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, सरसंघचालक मोहन भागवत आदींनी आवर्जून हजेरी लावली. त्यानिमित्त...
- सुरेश शहा, ज्येष्ठ पत्रकार

आचार्य विद्यासागर महाराज यांचे १७ फेब्रुवारी २०२४ रोजी डोंगरगड (छत्तीसगड राज्य) येथील चंद्रगिरी जैन तीर्थक्षेत्रावर यमसल्लेखना हे महाव्रत सुरू असताना महानिर्वाण झाले होते. आचार्यश्रींनी हे व्रत धारण करण्यापूर्वी मुनीसंघाचा तसेच आचार्यपदाचा त्याग करून त्यांचे प्रथम शिष्य १०८ श्री समयसागर महाराज यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते. त्यानुसार हा आचार्यपद प्रदान सोहळा आयोजित केला गेला होता. कुंडलपूर परिसरातील ११ एकर जागेत त्यासाठी भव्य मंडप उभारला होता. धार्मिक विधीनंतर मुनी संघाने त्यांना आचार्यपद स्वीकारण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी आचार्यपदाचा स्वीकार केला. या वेळी त्यांना मुनी संघाने नवीन मयूर पिंछी, तर आर्यीकानी कमंडलू प्रदान केले. सूत्रसंचालन नियमसागर महाराज व प्रमाणसागर महाराज यांनी केले.

श्री समयसागरजी महाराज यांचा अल्प परिचय
समयसागर महाराजांचे पूर्वाश्रमीचे नाव शांतीनाथ. त्यांचा जन्म २७ आॅक्टोबर १९५८ रोजी दुपारी २ वा. सदलगा (जि. बेळगाव, कर्नाटक) येथे झाला. त्यांची माता श्रीमतीजी अष्टंगे (जैन) व पिता मल्लपाजी अष्टंगे (जैन) हे धार्मिक प्रवृत्तीचे होते. शांतीनाथ यांचे शिक्षण मराठी माध्यमातून मॅट्रिकपर्यंत झाले. त्यानंतर त्यांनी १६ व्या वर्षी (२ मे १९७५) ब्रह्मचारी व्रत धारण केले. त्यानंतर क्षुल्लक मुनी दिक्षा व पुढे एल्लक मुनी दिक्षा घेतली. ८ मार्च १९८० रोजी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्याकडून द्रोणागिरी जैन सिद्ध क्षेत्रावर (छतपूर) निग्रंथ मुनी दिक्षा घेतली आणि ते आचार्यश्रींचे पहिले शिष्य झाले. गेल्या ४४ वर्षांत त्यांनी भारतात सर्वत्र हजारो मैल पायी भ्रमंती केली. मल्लप्पा अष्टंगे (जैन) या परिवाराचे जैन समाजाला लक्षणीय योगदान लाभलेले आहे. मल्लप्पा त्यांची पत्नी श्रीमतीजी (मुनीश्री मल्लीसागर महाराज व आर्यिका समयमती माताजी) तसेच त्यांचे सुपुत्र विद्याधर (आचार्य विद्यासागर महाराज), अनंतनाथ (मुनिश्री योगसागर), शांतीनाथ (मुनिश्री समयसागर) व महावीर (मुनिश्री उत्कृष्ट सागर) या सर्वांनीच मुनिदिक्षा घेतली असून, त्यांच्या दोन कन्या शांता व सुवर्णा यांनी बालब्रह्मचारी व्रत धारण केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com