शेतकऱ्यांना ६ कोटी ६० लाखांहून अधिक फायदा

शेतकऱ्यांना ६ कोटी ६० लाखांहून अधिक फायदा

पुणे, ता. २९ : नाममात्र एक हजार रुपये नोंदणी शुल्क आणि एक हजार रुपये मुद्रांक शुल्काच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना आपल्या ताब्यातील शेतजमिनीची अदलाबदल करण्याची संधी देणाऱ्या ‘सलोखा योजने’त आतापर्यंत राज्यात ७४३ दस्त नोंदविले गेले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अवघा सात महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे.
सलोखा योजनेत नोंदविल्या गेलेल्या दस्तांना एकूण मुद्रांक शुल्कात ५ कोटी ६७ लाख ८७ हजार रुपयांची तर नोंदणी फी मध्ये ९२ लाख ४९ हजार रुपयांची माफी देण्यात आली आहे. त्यामुळे ७४३ दस्तांना मुद्रांक शुल्क व नोंदणी फी मध्ये एकूण ६ कोटी ६० लाख ३७ हजार रुपयांची माफी मिळाली आहे. तर या योजनेमुळे शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीवरून सुरू असलेले वाद मिटण्यास मदत होत आहे.
एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांच्या अदलाबदल दस्तांसाठी सवलत देणारी ही योजना जानेवारी २०२३पासून राज्य सरकारकडून राबविण्यात येत आहे. या योजनेची मुदत जानेवारी २०२५मध्ये संपुष्टात येणार आहे. आतापर्यंत या योजनेत पुणे विभागात ११२ तर पुणे जिल्ह्यात एकूण १९ दस्त नोंदविले गेले आहेत. त्यामध्ये सातारा जिल्ह्यात ३१, सांगलीमध्ये ३१, सोलापूरमध्ये ११ आणि कोल्हापूरमध्ये २० दस्त नोंदविले गेले आहेत.
दरम्यान, राज्यातील हे ७४३ दस्त नोंदविण्यासाठी मुद्रांक शुल्कापोटी ५ कोटी ७१ लाख,१७ हजार रुपये भरावे लागले असते. तर नोंदणी फी पोटी ९४लाख रुपये भरावे लागले असते. मात्र सलोखा योजनेमुळे या दस्तांसाठी मुद्रांक शुल्कापोटी एकूण ७ लाख ९५ हजार रुपये तर नोंदणी फी म्हणून ७ लाख ४२ हजार रुपये भरावे लागले असते.

सलोखा योजनेच्या अटी
- शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान १२ वर्षांपासून असला पाहिजे
- या योजनेमध्ये पहिल्याचा ताबा दुसऱ्याकडे व दुसऱ्याचा ताबा पहिल्याकडे असणाऱ्या जमिनीच्या दोन्ही बाजूकडील क्षेत्रामध्ये कितीही फरक असला तरी ते या योजनेसाठी पात्र ठरतील.
- अकृषिक, रहिवासी तसेच वाणिज्यिक वापराच्या जमिनींसाठी ही योजना लागू राहणार नाही.
- दोन्ही पक्षकारांनी सर्वसंमतीने हा अदलाबदल दस्त नोंदवीत आहे, अशी प्रकारची अट दस्तामध्ये समाविष्ट करणे आवश्‍यक
- वस्तुस्थितीदर्शक पंचनामा मंडल अधिकारी व तलाठी यांनी नोंदवून घेणार असून पंचनामा प्रमाणपत्र शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.
- पंचनामा प्रमाणपत्र अदलाबदल दस्तास जोडणे आवश्‍यक

योजनेचा हेतू...
शेतजमिनीचे वाद हे अत्यंत क्‍लिष्ट व गुंतागुंतीच्या स्वरूपाचे असल्याने न्यायालयातील व प्रशासनातील पुरेशा यंत्रणेअभावी सदर वाद वर्षानुवर्षे चालू आहेत. शेतजमीन हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा व संवेदनशिल विषय असल्यामुळे त्यातील वादामुळे कौटुंबिक नात्यांमध्ये एकमेकांबद्दल असंतोषाची भावना व दुरावा निर्माण झाला आहे. या वादांमुळे अनेक पिढ्यांचे नुकसान झाले असून, आजच्या पिढीचाही खर्च व वेळेचा अपव्यय होत असून अशा प्रकारचे वाद संपुष्टात येण्यामध्ये म्हणावी अशी प्रगती झालेली दिसत नाही. या सर्व पार्श्‍वभूमीवर वाद संपुष्टात येण्यासाठी शासनाने सलोखा योजना आणली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com