Halley's Comet
Halley's Cometsakal

Halleys Comet : हॅलीज धूमकेतूंच्या कणांचा उल्कावर्षाव पाहण्याची संधी

सुमारे ३००० वर्षांपूर्वी हॅलीज धूमकेतूने मागे टाकलेल्या छोट्या कणांच्या समूहातून पृथ्वीचा प्रवास या महिन्यात होणार आहे. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उल्कांचा आविष्कार पाहण्याची संधी आपणास मिळेल.

सुमारे ३००० वर्षांपूर्वी हॅलीज धूमकेतूने मागे टाकलेल्या छोट्या कणांच्या समूहातून पृथ्वीचा प्रवास या महिन्यात होणार आहे. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उल्कांचा आविष्कार पाहण्याची संधी आपणास मिळेल. या उल्का आकाशात सर्वत्र दिसतील. मात्र त्यांचा माग घेतल्यास त्या कुंभ राशीतील ‘झीटा’ ताऱ्याजवळून फेकल्या गेल्यासारखे वाटेल. सेकंदाला ६५ किमी वेगाने हॅलीजचे कण पृथ्वीच्या वातावरणात शिरून ८० किमी उंचीवर असताना पेटून प्रकाश शलाकांची रेषा दाखवतात.

या उल्का १९ एप्रिल ते २८ मे पर्यंत दिसतात. मात्र त्यांचा जोर ५-६ मे रोजी पहाटे वाढतो. यावेळी साधारणपणे ताशी ५०-६० उल्का अंधाऱ्या ठिकाणाहून दिसू शकतील. या उल्कावर्षावास ‘इटा ॲक्‍वेरीडस्‌’ नावाने ओळखतात. हॅलीज धूमकेतू दर ७६ वर्षाने सूर्याला फेरी मारत असतो. सूर्याजवळ आल्यावर तापून त्याला मोठी शेपटी फुटते. या शेपटीतील वाळूसारखे छोटे कण मागे राहतात.

या कणांच्या सड्यातून पृथ्वी ऑक्‍टोबर व मे महिन्यात प्रवास करते व त्यामुळे उल्कांचे प्रेक्षणीय दृश्‍य पहावयास मिळते. यावर्षी चंद्र प्रकाशाचा त्रास नसल्याने उल्का दिसण्याची शक्‍यता आहे. सुमारे ३००० वर्षापूर्वी हॅलीने मागे टाकलेल्या कणांच्या समूहाजवळून पृथ्वीचा प्रवास ३ मे रोजी होत आहे. त्यामुळे या तारखे जवळपास ‘इटा ॲक्‍वेरीडस्‌’च्या उल्का दिसतील. या उल्का नुसत्या डोळ्याने दिसत असल्याने दुर्बीण किंवा बॉयनॉक्‍युलरची जरुरी नाही. अंधाऱ्या ठिकाणाहून ३ ते ६ मे या काळात पहाटे आकाशावर नजर ठेवून उल्का अवश्‍य पाहाव्यात.

ग्रह
बुध -
गेल्या महिन्याच्या युतीनंतर आता बुध पूर्व क्षितीजावर दाखल झाला आहे. तो सूर्योदयापूर्वी सुमारे तासभर उगवत असून मीन राशीत दिसेल. बुध सूर्यापासून दूर सरकत असून १० मे रोजी सूर्यापासून दूरात दूर अशा २६ अंशावर पोहचेल. यावेळी त्याची तेजस्विता ०.६ असेल. यानंतर बुध पुन्हा सूर्याकडे सरकू लागेल. या काळात त्याची तेजस्विता ०.६ पासून उणे ०.५ पर्यंत वाढताना दिसेल. मात्र याच काळात तो क्षितीजाकडे सरकत असल्याने संधी प्रकाशात दिसू लागेल. चंद्रकोरीजवळ बुध ६ मे रोजी असेल.

शुक्र - दक्षिणपूर्व क्षितीजावर दिसत असलेला तेजस्वी शुक्र या महिन्यात सूर्य सानिध्यामुळे दिसू शकणार नाही.

मंगळ - दक्षिणपूर्व क्षितीजावर पहाटे नारंगी रंगाचा मंगळ दिसेल. त्याच्या वरच्या बाजूस पिवळसर रंगाचा शनी दिसत असून या दोघांमधील अंतर गेल्या महिन्यापासून वाढत असून मे महिन्यात ते १५ अंशापासून ३० अंशापर्यंत वाढेल. मंगळ या महिन्यात मीन राशीत दिसेल. मंगळाचे बिंब अवघे ५ विकलांचे दिसत असून त्याची तेजस्विता १.१ असेल. मंगळ ८ मे रोजी सूर्याजवळच्या स्थानावर (पेरीहेलियन) पोहचेल. यावेळी तो आपल्यापासून १६ प्रकाश मिनिटे अंतरावर असेल. चंद्रकोरीजवळ मंगळ ५ मे रोजी दिसेल.

गुरू - या महिन्याच्या सुरूवातीस पश्‍चिम क्षितीजालगत गुरू दिसेल. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गुरू सूर्यास्तानंतर तासाभरातच मावळत असून तो सूर्याजवळ जात असून दिसेनासा होत आहे. गुरूची सूर्याबरोबर युती १९ मे रोजी होईल. आता पुढील महिन्यात त्याचे पूर्वेला दर्शन होईल.

शनी - दक्षिणपूर्व क्षितीजावर पहाटे शनी दिसेल. महिन्याच्या सुरूवातीस पहाटे सव्वातीन वाजता उगवणारा शनी लवकर उगवत जात महिना अखेरीस रात्री दीडच्या सुमारास उगवताना दिसेल. पिवळसर रंगाचा शनी कुंभ राशीतील ‘फाय’ ताऱ्याजवळ दिसत आहे. शनीचे बिंब १६ विकलांएवढे दिसत असून त्याभोवती ४० विकलांएवढी कडी दिसतील. काही महिन्यांपासून शनीभोवतालची कडी मिटू लागल्यासारखी दिसत असून या महिन्यात ती अवघी ३ अंशाने कललेली दिसतील. चंद्रकोरीजवळ शनी ४ मे रोजी दिसेल.

युरेनस-नेपच्यून - गेल्या महिन्यात पश्‍चिम क्षितीजालगत दिसणारा युरेनस आता सूर्याजवळ गेल्याने दिसू शकणार नाही. त्याची सूर्याबरोबर युती १३ मे रोजी होईल. नेपच्यूनची सूर्याबरोबर नुकतीच युती झाली असल्याने तो आता पूर्व क्षितीजावर दाखल झाला आहे. नेपच्यून मीन राशीतील लॅमडा ताऱ्याजवळ दिसत आहे. मंगळापासून अवघ्या १.७ अंशावर नेपच्यून दिसत असून त्याची तेजस्विता ७.८ आहे.

उल्का - कुंभ राशीच्या झीटा ताऱ्याकडून फेकल्या जाणाऱ्या ‘इटा ॲक्‍वेरीडस्’च्या उल्का ५-६ मे रोजी पहाटे दिसतील. या उल्का हॅलीज धूमकेतूंच्या अवशेषांमुळे दिसतात.

चंद्र - चैत्र अमावस्या ८ मे रोजी सकाळी ८.५१ तर वैशाख पौर्णिमा २३ मे रोजी संध्याकाळी ७.२२ वाजता होईल. चंद्र पृथ्वीजवळ (३,६३,१६६ किमी) ६ मे रोजी तर पृथ्वीपासून दूर (४,०४,६४१ किमी) १८ मे रोजी असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com