‘पीएमपी’च्या मार्गात आचारसंहितेचा ‘गतिरोधक’

‘पीएमपी’च्या मार्गात आचारसंहितेचा ‘गतिरोधक’

पुणे, ता. २९ ः ‘पीएमपी’च्या प्रवाशांना नव्या ५०० बसमधून प्रवास करण्यासाठी आणखी किमान चार महिने वाट पहावी लागेल. येत्या जूनपर्यंत दाखल होणाऱ्या नव्या बसच्या मार्गात लोकसभेच्या आचारसंहितेचा गतिरोधक उद््भवल्याचे खापर पीएमपी प्रशासनाने फोडले आहे. जून महिन्यात शाळा-महाविद्यालये सुरु झाल्यानंतर प्रवाशांना फटका बसणे अटळ आहे.
निविदा प्रक्रियेतील आर्थिक बोलीचा महत्त्वाचा टप्पा (फायनान्शियल बीड) आचारसंहिता संपल्यानंतरच खुला होईल. नव्या गाड्यांची प्रतिकृती (प्रोटोटाईप) बनविण्याची प्रक्रिया त्यानंतरच सुरु होईल. त्यानंतर गाड्यांचे उत्पादन आणि त्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणे हे टप्पे पार व्हावे लागतील. तोपर्यंत किमान ऑगस्ट महिना उजाडण्याची चिन्हे आहेत.
नव्या गाड्या ‘सीएनजी’ प्रकारच्या असतील. त्यातील ४०० भाडेतत्त्वावर घेण्याच्या निर्णयास संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली. १०० बस स्वतःच्या मालकीच्या घेण्याचा निर्णय त्यापूर्वीच झाला होता. वास्तविक एप्रिल-मे हा सुट्यांचा काळ असल्याने प्रवाशांची संख्या कमी असते. जूनमध्ये शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय करण्याच्यादृष्टीने नव्या बस दाखल करण्याचे नियोजन होते.
नव्या बस १२ मीटर आकाराच्या असतील. सध्या ई-बसच्या पुरवठ्यासंदर्भात अडचणी येत आहे. त्यामुळे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून‘पीएमपी’ बसच्या प्रतीक्षेतच आहे. अशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून ‘सीएनजी’ बस खरेदीचा निर्णय घेण्यात आला. याचा फायदा ‘पीएमपी’ व पर्यायाने प्रवाशांना होणार आहे.
---------------
बसची संख्या कमी
प्रवासी संख्येच्या तुलनेत बसची संख्या कमी आहे. त्यामुळे बसची उपलब्धता वाढविणे ‘पीएमपी’ला अपरिहार्य आहे. सातपैकी दोन ठेकेदारांची सेवा संपली असल्याने सुमारे २०० हुन अधिक जास्त बस प्रवासी सेवेतून बाद झाल्या आहेत, जून महिन्यात आणखी किमान ६० बसचे आयुर्मान संपणार आहे. सध्या शाळा व कॉलेज यांना सुटी असल्याने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या सुमारे २०० बस प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जात आहेत. जूनमध्ये मात्र बसचा मोठा तुटवडा जाणवेल.
-----------
३ लाख ६५ हजार प्रवाशांची सोय
सीएनजीच्या एका बसमधून दिवसाला सरासरी ७३० प्रवाशांची वाहतूक होते. ५०० नव्या बसच्या माध्यमातून दिवसाला किमान ३ लाख ६५ हजार प्रवाशांची वाहतूक होईल. जागेअभावी अनेक प्रवाशांना रोजच उभे राहून प्रवास करावा लागतो. बसची संख्या वाढल्यास त्याचे प्रमाण कमी होईल.
----------------
भाडेतत्त्वावरील आणि स्वःताच्या मालकीच्या बस घेण्यासाठीच्या निविदा प्रक्रियेला सुरवात झाली आहे. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. बस लवकरात लवकर उपलब्ध व्हाव्यात म्हणून आमचे प्रयत्न सुरु आहेत.
- सतीश गाटे, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल, पुणे
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com