Prithviraj Chavan
Prithviraj Chavansakal

Prithviraj Chavan : ... तर देश आज तिसऱ्या क्रमांकावर असता

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या मार्गाने विकास केला असता तर देश आज जगातील पाचव्या नाही, तर तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त लोकांना दिसेल असा विकास केला.

पुणे : “माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या मार्गाने विकास केला असता तर देश आज जगातील पाचव्या नाही, तर तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त लोकांना दिसेल असा विकास केला. त्यांनी देशाचा एक टक्काही सर्वंकष विकास केला नाही,” अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

चव्हाण यांनी ‘सकाळ’ कार्यालयाला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. मुख्य कार्यपालन अधिकारी (सीओओ) महेंद्र पिसाळ यांनी त्याचे स्वागत केले. या वेळी मुख्य संपादक सम्राट फडणीस उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, “रस्ते, बुलेट ट्रेन, विमानतळ करण्यावर मोदींनी भर दिला. हा विकास लोकांच्या नजरेला पटकन दिसतो. त्यामुळे देशाचा विकास केल्याचे दाखवता येते. प्रत्यक्षात देशातील सर्व विमानतळ विकसित करण्याचे काम एकाच उद्योजकाला दिले आहे. मग, तो विकास कसा ठरेल? विकास हा सर्वंकष असला पाहिजे.

असा सर्वंकष विकास अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांनी केला होता. देशाच्या विकासाचा तोच मार्ग मोदी यांनी धरला असता तर सध्या जगात पाचव्या स्थानावर असणारी आपली अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानापर्यंत पुढे गेली असती.”

भाजपवर शेतकरी नाराज आहेत. कांदा निर्यातीवर घातलेली बंदी हे मुख्य कारण असले तरीही ‘वस्तू व सेवा कर’ (जीएसटी) याचा फटका व्यापाऱ्यांबरोबरच शेतकऱ्यांनाही बसला आहे. त्यातून भाजप विरोधातील सूर वाढला आहे. राज्यात राजकीय पक्षांची केलेली फोडाफोडी लोकांना आवडलेली नाही. ही नाराजी मतदानातून बाहेर पडत आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या चिघळलेल्या प्रश्नामुळे विशेषतः मराठवाड्यातील मराठा मतदार भाजपविरोधात नाराजीचा सूर आळवत आहेत, असेही चव्हाण म्हणाले.

निवडणूक मोदीविरुद्ध राहुल अशी नाही

“ही निवडणूक मोदीविरुद्ध राहुल अशी नाही. देशात २०१४ला ‘अच्छे दिन’ आणि २०१९ मध्ये ‘मोदी मॉडेल’ दाखवून भाजपने निवडणुका जिंकल्या. त्या वेळी त्यांना मताधिक्य ३१ टक्क्यांपेक्षा जास्त मिळाले नाही. राम मंदिर, ‘जी २०’ हे एकेका दिवसाचे ‘इव्हेंट’ होते. त्याचा सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला कोणताही फायदा झाला नाही, असेही त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com