नव्या तंत्रज्ञानातून कलाकारांसमोर नवी आव्हाने
किंवा
नाटक हे माझे पॅशन

नव्या तंत्रज्ञानातून कलाकारांसमोर नवी आव्हाने किंवा नाटक हे माझे पॅशन

‘‘गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान वेगाने बदलत गेले, तशा अनेक गोष्टी सोप्या झाल्या. विशेषतः चित्रपट आणि मालिकांमध्ये आता अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पण त्यातून नवी आव्हानेही उभी राहिली आहेत’’, असे मत अभिनेते संजय नार्वेकर यांनी व्यक्त केले. नाटक हे माझे पॅशन आहे, ते मला प्रचंड आवडते, असेही त्यांनी सांगितले.

नार्वेकर सध्या ‘सर्किट हाऊस’ या नाटकाचे प्रयोग करत आहेत. यानिमित्त त्यांनी ‘सकाळ’ कार्यालयाला भेट देत विविध विषयांवर संवाद साधला. ‘‘चित्रपटसृष्टीला उद्योगाचा दर्जा द्यायलाच हवा. त्यातून कलाकारांचे आणि बॅकस्टेज आर्टिस्ट यांचे अनेक प्रश्न सुटतील आणि कामाला देखील शिस्त येईल’’, असे मतही नार्वेकर यांनी मांडले.
सध्या सुरू असलेल्या नाटकाबद्दल नार्वेकर म्हणाले, ‘‘एक मंत्री सर्किट हाऊसमध्ये येतो. पण तो ज्या कामासाठी येतो, त्याचा कसा बोजवारा उडतो आणि त्यातून निर्माण होणारा हास्यस्फोट, असा नाटकाचा विषय आहे. या मंत्र्याची भूमिका मी साकारतो. यात राजकीय अंगाने जाणारे विनोद असले तरी नाटक पूर्णपणे राजकीय विषयावरील नाही. कोरोनाच्या पूर्वीपासून याचे प्रयोग सुरू होते; पण कोरोनामुळे त्यात खंड पडला. कोरोनानंतर अनेकांनी नाटक पुन्हा सुरू करण्याबद्दल विचारणा केल्यामुळे आम्ही आता पुन्हा नियमितपणे आणि उत्साहात या नाटकाचे प्रयोग करत आहोत.’’
नार्वेकर सातत्याने वैविध्यपूर्ण नाटके करत असतात. रंगभूमीवरील या प्रेमाविषयी ते म्हणाले, ‘‘नाटक हे माझे पॅशन आहे, ते मला प्रचंड आवडते. नाटकाचे आपण ‘प्रयोग’ करतो; कारण त्यात दरवेळी काहीतरी नवीन घडतं आणि नवीन शिकायला मिळतं. नाटक ही शाळा कधीही बंद होत नाही. त्यामुळे मी सातत्याने नाटक करत असतो. आत्ता सुरू असलेले माझे २८ वे नाटक आहे.’’ तसेच, ‘कोरोनाचा त्रास तीन वर्षे सहन केल्यानंतर काहीसा साचलेपणा आला होता. तो दूर करण्यासाठी आता प्रेक्षकांना मनमुराद हसायचे आहे, निखळ मनोरंजन अनुभवायचे आहे’, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.

ठरवून विविधांगी भूमिका
‘‘एखादी व्यक्तिरेखा लोकप्रिय ठरली तरी त्याच पद्धतीच्या भूमिका वारंवार केल्यावर नटावर त्या पद्धतीचा शिक्का बसतो. कलाकारालाही त्यातून साचलेपणा येतो. हे टाळण्यासाठी मी ठरवून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका स्वीकारत गेलो’’, अशी भावना संजय नार्वेकर यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com