राष्ट्रीय कर्तव्यापासून दुरावल्याची मतदारांना खंत

राष्ट्रीय कर्तव्यापासून दुरावल्याची मतदारांना खंत

पुणे, ता. ९ : ‘‘मी आजपर्यंत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नऊ वेळा मतदान केले. परंतु, या निवडणुकीत मला मतदान करता आले नाही. मतदानाच्या चार दिवस आधी यादीत नाव नसल्याचे समजले. संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी मतदानाच्या दिवशी आपले नाव संबंधित केंद्रावर समाविष्ट केले जाईल, असे सांगत माझी बोळवण केली. मतदानाच्या दिवशी मी कुटुंबीयांसमवेत केंद्रावर गेलो. परंतु, माझे नाव मतदार यादीत नव्हते. त्यामुळे मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावता आले नाही,’’ अशी खंत वारजे माळवाडीतील रहिवासी संभाजी साळुंखे यांनी व्यक्त केली.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत काही नागरिकांना यादीत नाव नसल्याने मतदानापासून वंचित राहावे लागले. या संदर्भात साळुंखे म्हणाले, ‘‘निवडणूक आयोगाकडून मतदार जागृतीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. जनतेला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याचे आवाहन केले जाते. परंतु, मतदार यादीत नावच येत नसेल, तर दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे.’’ वडगाव येथील रहिवासी भालचंद्र दरेकर म्हणाले, ‘‘मागील निवडणुकीत मी आणि माझ्या कुटुंबीयांनी मतदान केले. परंतु, यावेळी घरातील तिघांची नावे आढळली नाहीत. केवळ यादीत नावे शोधण्यातच आमचा वेळ गेला.’’

पुणेकरांना चिंता
बारामती, सातारा आणि सोलापूर लोकसभा निवडणुकीत काहींची नावे न आढळल्याने त्यांना मतदान करता आले नाही. परंतु, हाच प्रश्‍न पुण्यात निर्माण झाल्यास नागरिकांना मतदानाचा हक्का बजावता येणार नाही. त्यामुळे मतदारांना यादीत आपले नाव आहे की नाही, हे अगोदरच तपासून घ्यावे लागणार आहे.

जिल्हा प्रशासनाकडून मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी अभियान राबविण्यात येते. काही मतदारांकडून यादीत नाव नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या, परंतु काहींची नावे दुसऱ्या मतदान केंद्राच्या यादीत होती. ती नावे शोधून दिली. स्थलांतरित मतदार आणि सहाय्यक मतदान केंद्रांमुळे कदाचित काही मतदारांना यादीत नाव आढळली नसण्याची शक्यता आहे. मतदारांनी आपले नाव यादीत असल्याची खात्री करावी. यादीत नाव नसल्यास मतदार नोंदणीसाठी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील सहा क्रमांकाचा अर्ज भरावा. छाननीत हा अर्ज वैध ठरल्यास त्यांना पुढील निवडणुकीत मतदान करता येईल.
- सुहास दिवसे, जिल्हाधिकारी, पुणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com