परिवर्तनाच्या बाजूने यंदा मतदान होणार

परिवर्तनाच्या बाजूने यंदा मतदान होणार

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत होत असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे देशात मोठ्या संख्येने असलेला आर्थिक दुर्बल घटक, शेतकरी, दलित समाज यांना सद्यःस्थितीत असुरक्षित वाटत आहे. त्यामुळे हा वर्ग परिवर्तनाच्या बाजूने यंदा मतदान करेल, अशी अपेक्षा माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केली.

प्रश्न : महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचाराच्या मुद्द्यांत काय फरक आहे?
उत्तर : राममंदिर उभारले, कलम ३७० हटविले, नागरिक नोंदणी कायदा अशा भावनिक मुद्द्यांवर महायुतीचा जोर आहे. उद्योगांसाठी त्यांनी बरेच काही केल्याचा दावा करीत आहेत. परंतु महागाई, बेरोजगारी, गरीब वर्गाला सामोरे जावे लागत असलेल्या समस्यांबद्दल ते बोलत नाही. हेच मुद्दे महाविकास आघाडीने प्रचारात घेतले असून त्यांना देशातील मोठ्या संख्येने असलेल्या मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कामगार आणि शेतकरी वर्गाबद्दलही महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचे ठोस आणि आश्वासक मुद्दे आहेत.

प्रश्न : यंदाच्या राजकीय प्रचारात वेगळेपण काय आहे?
उत्तर : लोकसभा निवडणूक यंदा वेगळ्या पद्धतीने लढविली जात आहे. राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष भाजपने सत्तेच्या राजकारणासाठी फोडले आहेत. राजकीय कुटुंबांत भांडणे लावली आहेत. निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसची बॅंक खाती गोठविण्याचा प्रयत्न केला. दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे. देशावर एकाधिकारशाही लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रचारासाठी मी सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर, इंदापूरला गेलो. तेथे सगळीकडे एकाधिकारीशाहीविरुद्ध जनमत निर्माण झाल्याचे दिसून आले. एका बाजूला धनशक्तीविरुद्ध दुसऱ्याबाजूला जनशक्ती, असा सामना या निवडणुकीत आहे.

प्रश्न : वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या पक्षांमुळे महाविकास आघाडीची मतविभागणी होईल का?
उत्तर : वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न केले. परंतु, प्रकाश आंबेडकर यांनी हट्ट सोडला नाही. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे; परंतु, एकाधिकारशाहीच्या विरोधात लढण्यासाठी त्यांनी समजूतदारपणा दाखविणे गरजेचे होते. आमच्या राजकीय विजयासाठी नाही तर, वंचितांच्या भल्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीत यायला हवे होते. एमआयएम ही भाजपची बी टिम आहे, हे आता मतदारांनाही समजून चुकले आहे. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे मतदार गेल्या दोन निवडणुकांपासून बरेच काही शिकले आहेत. हा मतदार आता महाविकास आघाडीकडे वळाला आहे.

प्रश्न : कॉंग्रेसचे शहरासाठी काय व्हीजन आहे?
उत्तर : मेट्रो, जायका हे प्रकल्प कॉंग्रेसच्या काळात मंजूर झाले आहेत. त्याची फक्त अंमलबजावणी आत्ता झाली आहे. रिंगरोडचे काम अद्याप सुरू झालेले नाही. राज्यात आणि केंद्रात सत्ता असूनही भाजपला पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारता आलेला नाही. बेरोजगार युवकांची संख्या वाढत आहे. कॉंग्रेसला सत्ता मिळाल्यावर झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास, रिंगरोड, विमानतळ, युवकांचा कौशल्य विकास, आर्थिक दुर्बल वर्गातील महिलांना रोजगार, गरिबांना पुरेसे धान्य उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. पुण्यातून स्थलांतरित होणाऱ्या उद्योगांना येथेच चांगल्या सुविधा देऊन शहरातून रोजगारनिर्मितीत वाढ करू. तसेच सार्वजनिक वाहतूक सक्षम करून वाहतुकीचा प्रश्न सोडविला जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com