गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

घरी येण्यास उशीर झाल्याने पत्नीला मारहाण

पुणे : घरी येण्यास एवढा उशीर का झाला? असे विचारल्याने रागावलेल्या पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना विमाननगर परिसरात घडली. याबाबत पत्नीने (वय ५०, रा. यमुनानगर, विमाननगर) विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पती सबनीस लोटकेराम काळे वय (६०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी सायंकाळी पती सबनीस घरी आला. त्यावेळी तिने पतीला घरी येण्यास एवढा उशीर का झाला, अशी विचारणा केली. त्यामुळे पतीने रागाच्या भरात पत्नीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, सिमेंटच्या विटेने मारहाण करून जखमी केले.

उधार पैसे न दिल्याने मित्रावर वार
पुणे : उधार पैसे न दिल्यामुळे एकाने मित्रावर कोयत्याने वार केल्याची घटना वारजे परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी धनंजय बोराणे (वय ३८, रा. रामनगर, वारजे) याला ताब्यात घेतले आहे. सचिन तानाजी भानसे (वय ३५) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सचिन भानसे याने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून धनंजय बोराणे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हे दोघे मित्र असून, मजुरीचे काम करतात. ते रामनगर झोपडपट्टी परिसरात भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहतात. धनंजयने बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सचिनकडे ९०० रुपये देण्याची मागणी केली. परंतु, सचिनने पैसे देण्यास नकार दिल्याने धनंजयने त्याच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात सचिन जखमी झाला आहे.


कात्रज भागात घरफोडीत दागिने चोरी
पुणे : चोरट्यांनी बंद सदनिकेच्या दोन्ही दरवाजांचे कुलूप तोडून दोन लाख ८६ हजारांचे दागिने आणि रोकड चोरी केली. ही घटना कात्रज परिसरातील गुजरवाडीमध्ये घडली. या प्रकरणी अनिल शंकर म्हस्के (वय ३६, रा. महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, गुजरवाडी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. म्हस्के कुटुंबीय धुळे येथे गेले होते. चोरट्यांनी सदनिकेच्या दोन्ही दरवाजांचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरी केली. म्हस्के कुटुंबीय गुरुवारी (ता. ९) घरी परतल्यानंतर त्यांना सदनिकेच्या दरवाजाचे कुलूप तोडल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

पीमपी बसमधून ज्येष्ठ महिलेचे दागिने चोरी
पुणे : पीएमपी बसमधून उतरताना ज्येष्ठ महिलेची दीड लाखांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी लंपास केली. ही घटना शिवाजीनगर परिसरात गुरुवारी (ता. ९) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी एका ज्येष्ठ महिलेने (वय ७०, रा. मोरदरी, ता. हवेली) शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीएमपी बसमधून प्रवास करताना चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेची हातातील सोन्याची बांगडी कटरने कापली. शिवाजीनगर येथील बस थांब्यावर महिला बसमधून उतरली. तेव्हा महिलेला बांगडी चोरीस गेल्याचे लक्षात आले.

अटकेची भीती दाखवून ८२ लाखांची फसवणूक
पुणे : मनी लॉड्रिंगच्या व्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका व्यक्तीची ८२ लाख २८ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका व्यक्तीने (वय ५९, रा. प्रतीकनगर, येरवडा) फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सायबर चोरट्यांनी तक्रारदाराच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. टेलिकॉम विभागातून बोलत असल्याचे सांगून तुमच्या मोबाइलचा गैरवापर होत आहे. तुमच्या बॅंक खात्यातून कोट्यवधी रुपयांचे मनी लॉड्रिंगचे व्यवहार झाले आहेत. याबाबत गोवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अटक करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी फिर्यादीकडून वेळोवेळी ८२ लाख २८ हजार रुपये उकळले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com