पंतप्रधान मोदींचे देशासाठी योगदान काय?

पंतप्रधान मोदींचे देशासाठी योगदान काय?

पुणे/हडपसर, ता. ११ ः ‘‘पंडित नेहरू स्वातंत्र्यासाठी १३ वर्षे तुरुंगात राहिले. पाकिस्तानला धडा शिकविणाऱ्या इंदिरा गांधी यांची हत्या झाली. राजीव गांधी यांनी देशासाठी प्राण दिले. नेहरू-गांधी कुटुंबाने देशासाठी सर्वस्व दिले, त्याच कुटुंबातील राहुल गांधी यांची तुम्ही टिंगलटवाळी करता ? गांधी कुटुंबीयांनी देशासाठी योगदान दिले, तसे तुम्ही देशासाठी काय योगदान दिले ? ’’ अशी घणाघाती टीका करत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ‘‘स्वातंत्र्य, देशाचे ऐक्‍य, विचारधारा नसलेल्या पक्षात आम्ही जाण्याचा प्रश्‍नच नाही, मात्र तुम्हाला सत्तेतून खाली उतरवणार, असे आव्हानही त्यांनी दिले.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी हडपसरमध्ये सभा झाली. कॉंग्रेसचे नेते विश्‍वजित कदम, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार महादेव बाबर, जगन्नाथ शेवाळे, प्रकाश म्हस्के, ॲड. जयदेव गायकवाड, अंकुश काकडे, विजय देशमुख, प्रशांत जगताप यांच्यासह कम्युनिस्ट पक्ष, ‘आप’चे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
तामिळनाडूची निवडणूक एका दिवसात आणि महाराष्ट्रासाठी सात टप्पे कशासाठी? असा प्रश्‍न उपस्थित करत पवार यांनी निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना पवार म्हणाले, ‘‘पूर्वी जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांची संपूर्ण राज्यासाठी फक्त एकच सभा रेसकोर्सला झाली. परंतु आता एका राज्यात एका दिवशी सात-आठ ठिकाणी सभा घ्यायची वेळ देशाच्या पंतप्रधानांवर आली आहे. इतक्‍या सभा घेऊन योग्य परिणाम होत नाही आणि शासनावर दबाव टाकून निवडणुकीचे निकाल वेगळे लागतील, यासाठी खबरदारी म्हणून ते वारंवार सभा घेत आहेत का?’’

निवडणुकीपूर्वी जिल्हा बॅंक उघडी कशी?
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक झाली, त्या वेळी एका ठिकाणी रात्री दोन वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची शाखा उघडी होती. मतदानाच्या आदल्या मध्यरात्री बॅंक उघडी असते, ३०-४० लोक येत-जात असतात. तिथे व्यवहार सुरू होता. महाराष्ट्रात असे कधीही घडले नाही. मात्र या वेळी घडले. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया स्वच्छ होती का? अशी शंका येऊ लागली असल्याचे पवार यांनी आवर्जून नमूद केले.

विश्वजित कदम म्हणाले...
- शेतकरी, गरीब, कष्टकऱ्यांचे मोदी सरकारला देणेघेणे नाही.
- कोरोना काळात चांगले काम करूनही भाजपने शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस फोडली.
- महाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय गुजरातमध्ये पळवून नेले.
- महागाई, जातीधर्मातील द्वेष कमी करण्यासाठी महाविकास आघाडीवर विश्‍वास ठेवून मतदान करा.

शरद पवार म्हणाले...
- भाजपकडे १० वर्षे सत्ता, मग कॉंग्रेसवर टीका का?
- महिलांचे दागिने, मंगळसूत्र अशा विषयांवर कुठलाही पक्ष बोललेला नाही
- महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या संख्येने सभा घेण्याची मोदींना आवश्यकता का ?
- असत्य मुद्दे मांडून व्यक्तिगत टीका करण्यावर मोदींचा भर
- सत्तेचा, अधिकारांचा गैरवापर हे मोदींचे वैशिष्ट्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com