शक्तिप्रदर्शनाने कॉंग्रेसच्या प्रचाराची सांगता

शक्तिप्रदर्शनाने कॉंग्रेसच्या प्रचाराची सांगता

पुणे, ता. ११ : पुणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात रॅलीच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत शनिवारी प्रचाराची सांगता केली. ‘जनशक्ती विरुद्ध धनशक्ती,’ ‘लोकशाही विरुद्ध हुकूमशाही’ आणि संविधान वाचविण्यासाठीची लढाई आहे. पुणेकर जनता या लढाईत मला साथ देऊन विजयी करेल’’, असा विश्‍वास धंगेकर यांनी व्यक्त केला.
पुणे लोकसभा मतदार संघासाठी सोमवार (ता. १३) मतदान होणार आहे. प्रचाराची सांगता शनिवारी सायंकाळी सहा वाजता झाली. गेल्या ३० दिवसांमध्ये संपूर्ण मतदारसंघात ३७ पदयात्रा, रॅली आणि कोपरा सभेच्या माध्यमातून धंगेकर यांनी अधिकाधिक मतदारांशी संवाद साधला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सहाही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये पक्षाकडून मतदारसंघनिहाय नेमण्यात आलेल्या निरीक्षकांसह माजी खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री डॉ. विश्‍वजित कदम, सुनील केदार, यशोमती ठाकूर, विकास ठाकरे यांच्यासह शहर पातळीवर महाविकास विकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीच्या माध्यमातून धंगेकर यांनी मतदारांशी संपर्क साधला.
दरम्यान, धंगेकर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेनेचे (उबाठा) शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, प्रचारप्रमुख मोहन जोशी, प्रवक्ते गोपाळ तिवारी, कमल व्यवहारे, आप, रिपब्लिकन पक्ष यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते मंडळी उपस्थित होते.

प्रचारासाठी नेत्यांच्या झाल्या सभा
प्रचाराच्या दरम्यान महाविकास आघाडीचे प्रदेश पातळीवरील नेते मंडळी मोठ्या प्रमाणावर पुण्यात तळ ठोकून होते. पक्षाचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्राचे निरीक्षक रमेश चेन्नीथला, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांच्या सभेच्या माध्यमातून धंगेकर यांनी मतदारसंघ ढवळून काढला.


पत्रकार परिषदेत धंगेकर म्हणाले....
- केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराविरोधात जनमत तयार
- महागाई, बेरोजगारीमुळे जनता मेटाकुटीला आली
- जनतेने ही निवडणूक हाती घेतली
- ही निवडणूक लोकशाहीविरूद्ध हुकूमशाही, धनशक्तीविरुद्ध जनशक्ती
- संविधान वाचविण्यासाठची आमची लढाई
- जनता माझ्या पाठीशी उभी राहील आणि माझा विजयी निश्‍चित करेल


भाजपकडून पैशांचे वाटप : धंगेकर
रवींद्र धंगेकर यांनी भाजपने शहरात मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप सुरू केल्याचा आरोप केला. याप्रकरणी आपण पोलिस आयुक्तांना पत्र दिले असून त्यांनी तातडीने यामध्ये लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी विनंतीही केली. कसबा पोटनिवडणुकीच्या वेळेसही अशाप्रकारे भाजपकडून मोठ्या प्रमाणावर पैसे वाटले होते. तोच प्रकार यावेळीही होत आहे, असेही ते म्हणाले.


केंद्रातील सरकारकडून सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्याचा राग नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे पुण्यासह संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी चांगले वातावरण आहे. ईडी, सीबीआयचा गैरवापर केला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भाजपविषयी राग आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांना पुणेकरांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे धंगेकर यांचा विजय निश्चित आहे.
- डॉ. विश्‍वजित कदम,
माजी मंत्री (पत्रकार परिषदेत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com