कोट्यवधी गरिबांच्या आयुष्यात
केंद्राच्या योजनांमधून परिवर्तन

कोट्यवधी गरिबांच्या आयुष्यात केंद्राच्या योजनांमधून परिवर्तन

पुणे, ता. ११ : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरिबांचे मसिहा आहेत, त्यांनी केंद्र सरकारच्या योजनांमधून कोट्यवधी गरिबांच्या आयुष्यात परिवर्तन घडविले. पण, गरिबी हटाव म्हणणाऱ्या काँग्रेसने स्वतःची गरिबी हटविली’’, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
लोकसभेचे भाजप-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचार समारोपाच्या सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी उमेदवार मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, लोकसभेचे निरीक्षक रणजितसिंह निंबाळकर, शहराध्यक्ष धीरज घाटे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार जगदीश मुळीक, सनी निम्हण, प्रदीप देशमुख, परशुराम वाडेकर आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘‘मोहोळ यांना सर्वसामान्य लोकांचे प्रश्न माहिती आहेत. कोरोनाकाळात अनेक नेते घरी बसून होते, पण ते स्वतः रस्त्यावर उतरून कामे केली. पुणेकरांना आरोग्य सुविधा पुरविल्या. नरेंद्र मोदी यांच्या योजनांमुळे पुणे बदलत आहे. सामान्य माणसाच्या आयुष्यात परिवर्तन केले. मोदी गरिबांचे मसिहा असून, कोट्यवधी लोकांना घरे मिळाली, घरात गॅस आला, स्वच्छतागृह आले, मोफत रेशन दिले. ६४ कोटी लोकांना १० लाख कोटींचे विनातारण कर्ज दिले. आता २० लाख रुपयांपर्यंत कर्ज देणार आहोत.
८० लाख बचत गटांच्या माध्यमातून १० कोटी महिलांना रोजगार दिला, त्यातील तीन कोटी महिला लखपती दीदी बनणार आहेत.
दलित तरुणांना उद्योगासाठी स्टॅंडअप इंडिया योजना आणली, १२ बलुतेदारांचा विचार आत्तापर्यंत काँग्रेसने केला नव्हता, पण मोदींनी त्यांच्यासाठी १४ हजार कोटी रुपये दिले. ७० वर्षांवरील नागरिकांना सर्व उपचार, शस्त्रक्रिया, औषध मोफत मिळतील. यासाठी केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आवश्‍यक आहे.’’

जनतेला सोबत घेणाऱ्या
मोदी यांना साथ द्या
आजच्या समारोपाच्या सभेला महिलांची गर्दी मोठी आहे. ज्यांना महिलांचा आशीर्वाद मिळतो, तो जिंकणार, हे निश्‍चित आहे. मोदी यांच्या मागेही माता-भगिनींची मोठी ताकद आहे. या निवडणुकीत दिल्लीचा नेता निवडायचा आहे. कोण गरिबांचे कल्याण करू शकतो, याचा विचार करा. आपली पांडव सेना असून, त्याचे नेतृत्व मोदींकडे आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी यांची २४ पक्षांची खिचडी आहे. ते संगीत खुर्ची खेळून पंतप्रधान निवडतील. आपल्याला खासगी कंपनीचा प्रमुख नेमायचा नाही तर देशाचा प्रमुख नेमायचा आहे. त्यामुळे जनतेला सोबत घेऊन जाणाऱ्या मोदींना साथ द्या, असे आवाहन फडणीस यांनी केले.

मुरलीधर मोहोळ म्हणाले...
- गणेश मंडळाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भाजपने स्थायी समिती अध्यक्ष केले, महापौर केले. आता जनतेने लोकसभेसाठी आशीर्वाद द्यावा
- कोरोनाकाळात रुग्णसेवा देताना माझ्यापुढे मोठे आव्हान होते
- कोरोनामध्ये ऑक्सिजन पुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागली, पण हा पुरवठा कायम ठेवून अनेकांचे प्राण वाचविले याचे समाधान
- प्रचारात पुणेकरांनी मला प्रचंड प्रेम दिले. मला पुणेकरांवर विश्वास आहे.
- देशातील सर्वोत्तम शहर करण्याचा शब्द मी तुम्हाला देतो
- विरोधकांनी प्रचारात वैयक्तीक टीका केली, पण शहराचा विकास महत्त्वाचा असल्याने त्यांच्यावर टीका टाळली


महाराष्ट्रातील वारे फिरले आहे, आपला विजय निश्‍चित आहे. विरोधक बेमोसमी असून, ते येतात आणि जातात. या बदललेल्या मौसमामुळेच शरद पवार त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील.
- देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com