पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात क्रीडा क्षेत्राला ‘अच्छे दिन’

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात क्रीडा क्षेत्राला ‘अच्छे दिन’

पुणे, ता. ११ : टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारताला सात पदके मिळाली, पॅरालिंपिक्समध्ये १९ पदके मिळाली, आशियाई स्पर्धेत १०७ पदके मिळाली, बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत २२ सुवर्णपदकांसह ६१ पदके मिळाली. ही गेल्या ४० वर्षांतील देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम कामगिरी असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात क्रीडा क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आले असल्याचे मत पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केले.
मोहोळ म्हणाले, ‘‘देशात चांगल्या खेळाडूंची वानवा कधीच नव्हती. मात्र त्यांच्या गुणवत्तेचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धांमध्ये कधीच प्रभाव दिसत नव्हता. पंतप्रधान मोदी यांनी वरिष्ठ खेळाडूंशी थेट संवाद साधला. पंतप्रधान थेट तुमच्याशी बोलतात ही भावना खूप महत्त्वाची होती. या चर्चेतून उपाययोजना केल्या, उत्तम खेळाडू शोधले, त्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा व मनुष्यबळ उपलब्ध करून दिले, स्पोर्ट्‌स सायन्सला महत्त्व दिले. १५ ऑगस्टला जनपथवर बोलावून सन्मान दिला. यातून खेळाडूंचा आत्मविश्‍वास वाढला आणि देशात क्रीडा संस्कृती विकसित होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल यश पाहायला मिळाले.’’
मोहोळ पुढे म्हणाले, ‘‘भारतात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी मोदींनी ‘खेलो इंडिया’ ही शालेय स्तरावरील क्रीडा स्पर्धा सुरू केली. त्यासाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांची तरतूद केली जाते. ‘खेलो इंडिया’च्या नऊ हजार केंद्रांना मान्यता दिली. विविध खेळांसाठी संकुले, प्रशिक्षण केंद्रे आणि ३०७ क्रीडाविषयक पायाभूत प्रकल्पांना सरकारने मंजुरी दिली. ‘टार्गेट ऑलिंपिक पोडियम योजने’त खेळाडूंना दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते. २०२८च्या ऑलिंपिक स्पर्धेत पहिल्या दहा देशांत भारताने स्थान मिळविण्याचे लक्ष आहे. तब्बल ४० वर्षांनंतर भारतात झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या बैठकीत २०३६मध्ये ऑलिंपिक स्पर्धांच्या यजमानपदासाठी भारत तयार असल्याची घोषणा भारताने केली आहे. मोदींच्या नेतृत्वात क्रीडा क्षेत्राला सुवर्णकाळ येईल,’’ असा विश्‍वास मोहोळ यांनी व्यक्त केला.

पुणे शहरातही क्रीडा संस्कृतीचा विकास
मोहोळ म्हणाले, ‘‘पुणे महापालिकेत सत्तेत आल्यावर भाजपने क्रीडा धोरणाला मंजुरी दिली. स्वतंत्र क्रीडा धोरण, क्रीडा नर्सरी, प्रशिक्षण, दत्तक योजना, क्रीडा सुविधा, शिष्यवृत्ती योजना, खेळाडूंना पारितोषिके, सन्मान, अर्थसाह्य, नोकरीत संधी, अपघात विमा योजना, स्पर्धेसाठी अर्थसाह्य आदी माध्यमांतून शहरात क्रीडा संस्कृतीचा विकास करीत आहोत. मी महापौर असताना शहरातील २५५ छत्रपती पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती माझ्या हस्ते देण्यात आली. राज्यातील महायुती सरकारने छत्रपती पुरस्कार आर्थिक रक्कम ५० हजार रुपयांवरून तीन लाखांपर्यंत वाढविली. महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती व प्रोत्साहने वाढवली आहेत. २०३६ ऑलिंपिक यजमानपदाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शहरामध्ये क्रीडा क्षेत्राचा पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न करू.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com