अत्याचारास विरोध केल्याने महिलेचा खून

अत्याचारास विरोध केल्याने महिलेचा खून

पुणे, ता. १२ ः निर्जनस्थळी घडलेल्या बेवारस महिलेच्या खूनाचा छडा लावण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे. शरीर संबंधास नकार दिल्याच्या कारणातून एकाने महिलेचा गळा दाबून खून केल्याचे पुढे आले आहे. कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी या प्रकाराचा उलगडा केला आहे.
याप्रकरणात हडपसर पोलिसांनी विक्रम ऊर्फ बाळू रघुनाथ जाधव (वय ३०, रा. खामगाव फाटा, उरुळी कांचन, मूळ रा. लातूर) याला अटक करण्यात आली आहे. विक्रम हा एका नर्सरीत काम करतो. सहा एप्रिलला दुपारी साडेचारच्या सुमारास मांजरी रेल्वे स्टेशनजवळील शेतात एका अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आल्याचा फोन नियंत्रण कक्षाला आला होता. त्यांनी याबाबत हडपसर पोलिसांना माहिती दिली. शवविच्छेदन अहवालात महिलेचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे पुढे आले. त्यानुसार हडपसर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
घटनेच्या दिवशी विक्रम रविदर्शन येथे आला होता. त्याला ती फिरस्ती महिला दिसली. तिने विक्रम याला आपल्याला तहान आणि भूक लागल्याचे सांगितले. विक्रम याने महिलेला माझे घर येथून जवळच आहे, असे सांगून तिला रिक्षात बसवून मांजरी रेल्वे स्टेशन जवळील निर्जन परिसरात घेऊन गेला. तेथे गेल्यानंतर त्याने महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने त्याला विरोध करत आरडा-ओरडा केला. त्याचवेळी विक्रम याने महिलेचा जोरात गळा दाबला. त्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर विक्रम याने तेथून पळ काढून थेट मुळ गाव लातूर गाठले. दोन दिवस तो तेथे राहून पुण्यात परतला.
सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे कर्मचारी सुशील लोणकर, संदीप राठोड, प्रशांत टोणपे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखिल पवार, अमोल दणके आणि चंद्रकांत रेजीतवाड यांच्या पथकाने शोध घेतला.


आरोपी शोधण्यासाठी
३०० रिक्षा तपासल्या
महिलेची ओळख पटलेली नव्हती. पोलिसांच्या हातात कोणताही पुरावा नव्हता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली तेव्हा एक व्यक्ती एका महिलेला हाताला धरून घेऊन जाताना दिसून आला. त्यासाठी पोलिसांनी शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. विक्रम महिलेला सिरम इन्स्टिट्यूट येथून रिक्षाने मांजरी रेल्वे स्टेशनकडे जाताना दिसून आला. पोलिसांना रिक्षावर शाळेची जाहिरात दिसली. तब्बल ३०० रिक्षातून पोलिसांनी विक्रम बसलेला रिक्षा शोधून काढली. त्यावेळी विक्रमच्या वास्तव्याचे ठिकाण पोलिसांना समजले. यवत परिसरात तो राहत असल्याची माहिती पोलिसांकडे होती. सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन कुदळे यांना मिळालेल्या बातमीवरून विक्रम याला खामगाव फाटा येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली.


कोणताही पुरावा हाती नसताना, महिलेच्या खुनाचा छडा लावला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. अत्याचारास विरोध केल्याच्या कारणातून आरोपीने महिलेचा खून केल्याचे पुढे आले आहे.
-संतोष पांढरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हडपसर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com