मतदानोत्सव उत्साहात

मतदानोत्सव उत्साहात

पुणे, ता. १३ ः सकाळी सात पूर्वीच मतदान केंद्रापुढे लागलेल्या मतदारांच्या रांगा...पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांसह, कदाचित आयुष्यातील हे शेवटचे मतदान असेल असे म्हणणारे आजी आजोबा...हिंजवडी, रावेत भागात स्थलांतरित झालेले आयटीएन...कष्टकरी कामगार...महिला...व्यापारी असे सगळेच मतदानाच्या रांगेत अर्धा एक तास उभे होते. दुपारी ऊन वाढले तरी बहुतांश केंद्रांवर गर्दी होती. प्रसन्न भावनेने पुणेकरांनी लोकशाहीच्या उत्सवास उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

पुणे लोकसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाला तर, सायंकाळी पर्जन्यधारांच्या वर्षावात समारोप झाला. शहरात सकाळच्या वेळेत कोथरूड, कसबा, पर्वती, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरी या सर्वच मतदारसंघातील सोसायटी भागात सकाळी सातपासून मतदानासाठी केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. शहरात सकाळी सात ते नऊ या पहिल्या दोन तासांत ६.६१ टक्के मतदान झाले. नऊनंतर मतदानाला आणखी गती आली, सकाळी ११ पर्यंत १६.१६ टक्के इतके मतदान झाले. यामध्ये महिला मतदारांची संख्या वाढली. सकाळी ११ पासून तीन वाजेपर्यंतही मतदारांचा उत्साह कमी झालेला नव्हता. तेव्हापर्यंत ३३ टक्के मतदान झाले. त्यात कोथरूड आणि पर्वतीमध्ये सर्वाधिक तर, त्या खालोखाल कसबा पेठेत मतदान झाले. उन्हाचा मतदानावर विपरीत परिणाम होईल, ही शंका फोल ठरली. निवडणूक आयोगाने अनेक केंद्रावर ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था केली होती. त्यामुळे या मतदारांना दिलासा मिळाला. काही केंद्रांवर व्हीलचेअर नसल्याने त्रास सहन करावा लागला. बहुतांश ठिकाणी पिण्यासाठी थंड पाण्याची सोय, बसण्यासाठी खुर्च्या ठेवण्यात आल्याने भर उन्हात मतदानासाठी आलेल्या नागरिकांनी त्याचे स्वागत केले. सकाळी ११ ते दुपारी एक आणि दुपारी एक ते तीन या काळात मतदान केंद्रावरील गर्दी काहीशी कमी झाली होती. अखेरच्या चार तासांत पुणे कॅन्टोन्मेंट, पर्वती, कोथरूड, कसबा या मतदारसंघात मतदारांनी विशेषतः वस्ती भागातील मतदान केंद्रांवर गर्दी दिसत होती तर, वडगाव शेरी, शिवाजीनगर या भागात तुलनेने कमी मतदार बाहेर पडले.

नाव नसल्याने मतदार संतप्त
मागच्या निवडणुकीत तर याच ठिकाणी मतदान केले होते. यापूर्वी आम्ही सहकुटुंब मतदान करत आलो आहोत. पण आता माझे नाव नाही. असे एक नाही तर हजारो मतदार पुण्यात मतदान केंद्र शोधत फिरत होते. तीन चार मतदान केंद्रांवर फिरून आल्यानंतर नाव सापडल्याने ते संतप्त झाले होते. काही जणांचे नाव मतदार यादीतून डिलीट केले होते. तर काहींचे नाव का गायब झाले आहे याचा त्यांना शोधच लागत नव्हता.

रिक्षा, कारची व्यवस्था
कडक ऊन, पावसाची शक्यता यामुळे सकाळच्या वेळेतच आपल्या हक्काच्या मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू होते. मोबाईलवरून संपर्क साधून तुम्ही तयार होऊन बसा मी घ्यायला येतो असा निरोप मतदारांना पाठवला जात होता. हिंजवडी, रावेत, धायरी, आंबेगाव, वाकड, पिंपरी-चिंचवड या भागांत राहाण्यासाठी गेलेल्या मतदारांसाठी मोटार, रिक्षा पाठविल्या जात होत्या. तसेच मतदान केंद्राजवळ राहणाऱ्या महिला. ज्येष्ठ नागरिकांना देखील वाहने पाठवून मतदानाला आणले जात होते. तर, कोथरूडमध्ये काही सोसायट्यांत रिक्षांची व्यवस्था करण्यात आली होती.

तळमजल्यावर मतदान केंद्र
मतदारांना पायऱ्या चढून पहिल्या मजल्यावर जाऊन मतदान करण्याची वेळ येऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने सर्व केंद्रे तळमजल्यावरच ठेवली होती. ज्या शाळेत वर्गखोल्या कमी आहेत, तेथे मैदानामध्येच तात्पुरते केंद्र उभारले होते.

मतदानाची वैशिष्ट्ये
- सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेले नागरिक थेट सकाळी सात वाजता थेट मतदान केंद्रावर गेले
- मतदानामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा उत्साहाने सहभाग

- घरकाम किंवा अन्य काम करणाऱ्या महिला ११ नंतर मतदानाला
येण्याचे प्रमाण वाढले
- मतदान केंद्रावर मतदार सहाय्यता कक्षामुळे मतदान क्रमांक, खोली शोधणे सहज झाले
- मतदान खोलीमध्ये व्हीलचेअर नेता यावी यासाठी ठिकठिकाणी छोटेमोठे रॅम्प तयार केले होते
- मतदान केंद्रात मोबाईल येण्यास पोलिसांचा मज्जाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com