वसा ‘बालरंग’ महोत्सवाचा...

वसा ‘बालरंग’ महोत्सवाचा...

आजच्या माहितीच्या युगात मुलांचं रंजन करेल, असं सकस माध्यम शोधून त्याद्वारे सतत २५ वर्षे एखादी चळवळ अत्यंत यशस्वीपणे सुरू ठेवणं ही कौतुकास्पदच गोष्ट आहे. ही किमया साधली आहे पुण्यातील महाराष्ट्र कल्चरल सेंटर आयोजित ‘बालरंग महोत्सवा’नं. या रौप्यमहोत्सवी उपक्रमाचा प्रवास आणि त्यातून झालेल्या मुलांच्या रंजनाविषयी...
- प्रमोद काळे

‘बालरंग’ महोत्सवाचं नाव सुरुवातीला ‘ग्रिप्स महोत्सव’ होतं. या सगळ्याची सुरुवात झाली १९८६ मध्ये ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे जर्मनीला गेले तेव्हा. तिथं त्यांनी बालनाट्याचा प्रकार पाहिला. ही कल्पना त्यांनी थिएटर अॅकॅडमीमध्ये मांडली. श्रीरंग गोडबोले यांनी या पद्धतीनं पहिलं नाटक लिहिलं ‘छान छोटे, वाईट मोठे...’. या नंतर त्यांनीच लिहिलेली ‘नको रे बाबा’ आणि ‘पहिलं पान’ ही नाटकं रंगमंचावर आली. थिएटर अॅकॅडमीनं हा उपक्रम १० वर्षे, म्हणजे १९९६ पर्यंत चालवला आणि मग तो बंद करायचं ठरवलं. तेव्हापासून या उपक्रमाची सर्व जबाबदारी महाराष्ट्र कल्चरल सेंटरने घेतली ! या संपूर्ण काळात कल्पना देवळणकर, श्रीराम पेंडसे, अनिल भागवत आणि उदय लागू यांनीही चळवळीत महत्त्वाचं योगदान दिलं.
यानंतर १९९८ मध्ये मे महिन्यात पहिला ‘ग्रिप्स महोत्सव’ मुलींची नूमवि शाळेत झाला. वरील तीन नाटकांव्यतिरिक्त शोभा भागवत यांनी लिहिलेलं ‘आम्ही घरचे राजे’ आणि श्रीरंग गोडबोले यांचं ‘पण आम्हाला खेळायचंय...’ ही दोन नाटकेही या महोत्सवात सादर झाली. पुढील आठ वर्षे हा महोत्सव मुलींच्या नूमविमध्ये आयोजित केला गेला, त्यानंतर काही वर्षे सुदर्शन रंगमंच इथं आणि ज्योत्स्ना भोळे सभागृह सुरू झाल्यावर तिथं हा महोत्सव अव्याहत सुरू आहे.
श्रीरंग गोडबोले यांच्यानंतर लेखन दिग्दर्शनाची धुरा विभावरी देशपांडे आणि राधिका इंगळे यांनी सांभाळली. त्यांच्या जोडीनं प्रमोद काळे, चेतन दातार आणि रसिका जोशी यांनीही हे काम केलं. तन्मय भिडे आणि श्रीनिधी झाड लिखित दिग्दर्शित ‘चेरी एके चेरी’ या नाटकाला यंदाचा सर्वोत्कृष्ट बालनाट्याचा ‘झी नाट्य गौरव पुरस्कार’ मिळाला आहे! आजवर ग्रिप्सनं विभावरी देशपांडे, आनंद इंगळे, परेश मोकाशी, पौर्णिमा मनोहर, अमृता सुभाष, उपेंद्र लिमये, शशांक शेंडे, प्रवीण तरडे, सारंग साठये, राधिका आपटे, ऋजुता देशमुख, आस्ताद काळे, सिद्धार्थ चांदेकर, क्षितीश दाते असे कलाकार दिले आहेत.
त्यानंतर ग्रिप्स पद्धतीच्या नाटकांबरोबरच लहान मुलांसाठीचे इतरही कार्यक्रम, नाटकांचा समावेश केला जाऊ लागला. यात गाण्यांचे कार्यक्रम, लहान मुलांनी केलेले ‘संगीत शारदा’, कवितांचे कार्यक्रम अशी विविधता आणण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातो आणि म्हणूनच याचं ‘ग्रिप्स महोत्सव’ नाव बदलून ‘बाल रंगमहोत्सव’ ठेवलं आहे.

यंदा १५ ते २३ मे दरम्यान हा महोत्सव
संस्थेच्या ‘श्रीराम लागू रंग अवकाश’ या नाट्यगृहात यंदा १५ ते २३ मे दरम्यान हा महोत्सव साजरा होईल. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलांसाठीच्या कार्यशाळा. यामध्ये विविध हस्तकला, स्वसंरक्षण, मातीकाम, पपेट्स असे अनेक पर्याय आहेत. या कार्यशाळा विनाशुल्क आहेत. गेली २५ वर्षे महोत्सवाचे आयोजन निभावणाऱ्या शुभांगी दामले यांचं या निमित्तानं मनःपूर्वक अभिनंदन!
लहान मुलांच्या किमान तीन पिढ्यांना या महोत्सवानं अपार आनंद दिला आहे. यंदाही मुलांचा आणि पालकांचा भरघोस प्रतिसाद मिळो, या शुभेच्छा!
(लेखक महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com