मतदान करणाऱ्यांना मिळाली बिलात सूट

मतदान करणाऱ्यांना मिळाली बिलात सूट

पुणे, ता. १३ : लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे म्हणून शहरातील काही व्यावसायिकांनी मतदान करणाऱ्यांना बिलात सवलत जाहीर केली होती. खाद्यपदार्थांचा यात प्रामुख्याने सहभाग होता. त्यामुळे अनेक पुणेकरांना मतदान करत इडली, आइस्क्रीम अशा पदार्थांवर ताव मारला.

‘यन्ना डोशा’च्या बिलात सवलत
अस्सल साउथ इंडियन डिशेससाठी प्रसिद्ध असणाऱ्या ‘यन्ना डोसा’ यांनी जास्तीत जास्त मतदान जास्त व्हावे, यासाठी विशेष उपक्रम आयोजित केला होता.‌ मतदान करून येणाऱ्यांना ‘यन्ना डोशा’च्या बिलामध्ये पाच टक्के सवलत देण्यात आली. मतदान केल्याचे दाखविणाऱ्या सर्व ग्राहकांना ही सवलत दिली. या उपक्रमास ग्राहकांनीही चांगला प्रतिसाद देत मतदान करून यन्ना डोसामध्ये जाऊन नाश्ता करण्यास पसंती दिली. निवडणुका हा लोकशाहीचा खरा उत्सव असून मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, या भावनेतूनच मतदारांसाठी आम्ही ही सूट जाहीर केल्याचे ‘यन्ना डोसा’चे संचालक प्रशांत शेट्टी यांनी सांगितले.

पुणे : यन्ना डोसा येथील पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी झालेली गर्दी


निम्म्या किमतीत पॉट आइस्क्रीम
मतदानाची टक्केवारी वाढावी आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडणाऱ्या मतदारांचे कौतुक व्हावे या हेतूने मतदान करणाऱ्या पुणेकर मतदारांना निम्म्या किमतीत ‘पॉट आइस्क्रीम’चा कप देण्यात आला. ‘शिरीष ट्रेडर्स’चे संस्थापक शिरीष बोधनी यांनी हा उपक्रम आयोजित केला होता. प्रभात रस्त्यावर कमला नेहरू पार्कजवळील दत्त मंदिर परिसरात हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. नागरिकांचा त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.

ग्राहक पेठेच्या चहापानाला प्रतिसाद
टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठ आणि ग्राहक पंचायतीतर्फे करण्यात आलेल्या ‘अगोदर मतदान, नंतर चहापान ग्राहकपेठेत’ या उपक्रमाला पुणेकर मतदारांनी भरघोस प्रतिसाद दिला. तब्बल तीन हजार मतदारांनी मतदान करून ग्राहकपेठेत चहापानाचा आनंद घेतला, अशी माहिती ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी दिली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी भीमाशंकर मेरू, शैलेश राणीम, सुनील वाणी, उदय जोशी, सारिका माने, सुवर्ण कोठारी-भंडगे यांनी विशेष प्रयत्न केले. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदान जागृतीसाठी गेले काही दिवस प्रयत्न केले जात आहेत. या अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला, असे पाठक यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com