कमळ फुलणार की, हात बाजी मारणार?

कमळ फुलणार की, हात बाजी मारणार?

पुणे, ता. १३ : शेवटच्या टप्प्यात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढविण्यात प्रशासन आणि राजकीय पक्षांना फारसे यश आले नाही. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सरळ लढत असलेल्या या निवडणुकीत पुन्हा कमळ तिसऱ्यांदा फुलणार की ‘हात’ बाजी मारणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

एकेकाळी पुणे शहर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, परंतु २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत अशा सलग दोन वेळा मोठ्या मताधिक्याने काँग्रेसला पराभव पत्कारावा लागला, तर त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसच्या हाती यश आले नाही. त्यामुळे शहर काँग्रेसमध्ये मरगळ आली होती, परंतु वर्षभरापूर्वी झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांच्या विजयाने काँग्रेसला पुन्हा ऊर्जा मिळाली. त्यातच गेल्या वर्षभरात राज्यात झालेल्या घडामोडींची पार्श्वभूमी आणि काँग्रेसकडून पुन्हा धंगेकर यांना रिंगणात उतरवल्याने निवडणुकीबाबत उत्सुकता ताणली गेली होती. दुसरीकडे भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना रिंगणात उतरवल्याने रंगत भरली होती.

चौथ्या टप्प्यात ही निवडणूक आल्याने महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही उमेदवारांना प्रचारासाठी भरपूर वेळ मिळाला. त्याचा फायदा जसा उमेदवारांना मिळाला, तसा दोन्ही पक्षांच्या राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीवर नेत्यांना या मतदारसंघाकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला. दोन्हीकडून नेत्यांच्या फौजा मैदानात उतरल्यामुळे शेवटच्या टप्प्यात निवडणुकीत रंग भरला. मतदानाचा टक्का फारसा वाढला नसला, तर गतवेळेस (२०१९) मध्ये झालेल्या एकूण मतांच्या संख्येत थोडी वाढ झाली. भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या आणि महायुतीचे उमेदवार असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात गतवेळेस झालेल्या मतदानाच्या टक्केवारीची तुलना केली, तर एक टक्क्यांनी मतदानात घट झाली आहे, तर महाविकास आघाडीचे उमेदवार धंगेकर नेतृत्व करीत असलेल्या कसबा विधानसभा मतदार संघातील मतदानाच्या टक्केवारीत सुमारे दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. सर्वाधिक मतदार असलेल्या वडगाव शेरी आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढला आहे. सहा विधानसभा मतदार संघांपैकी सर्वाधिक मतदार असलेल्या तिन्ही मतदारसंघातील मतदानाचा वाढलेला हा टक्का कोणाच्या फायद्याचा ठरणार, यावर विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? हे निश्चित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com